गोमंतकासह सिंधुदुर्गातील अनेक रुग्णालयांमध्ये संघटना ठरतेय महत्त्वाचा दुवा
सावंतवाडी । प्रतिनिधी : ‘युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी’ या संस्थेने आपल्या सामाजिक कार्याची बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. गोव्यातील विविध रुग्णालये तसेच ओरोस येथील रुग्णालयात गरजू रुग्णांना रक्ताची तातडीने गरज असताना, संघटनेच्या सदस्यांनी आणि रक्तदात्यांनी रक्तदान करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
तातडीने रक्त उपलब्ध करून दिले
गोवा बांबोळी रुग्णालयात दाखल असलेल्या सावंतवाडी येथील प्रदीप पोकळे यांना B+ पॉझिटिव्ह रक्ताची तातडीने गरज होती. अशावेळी, संघटनेचे सदस्य गणेश हरमलकर आणि खजिनदार अनिकेत पाटणकर यांनी गोवा बांबोळी येथे जाऊन रक्तदान केले. त्याचप्रमाणे, गोवा मणिपाल रुग्णालयात माजगाव येथील सूर्यकांत सावंत यांनाही B+ पॉझिटिव्ह रक्ताची गरज असताना, आंबोली येथील परेश कर्पे आणि सावंतवाडी येथील वैभव दळवी यांनी रक्तदान करून त्यांना मदत केली.
दुर्मिळ रक्तगटासाठी बसने प्रवास
गोवा बांबोळी रुग्णालयात दाखल असलेल्या सावंतवाडीतील एका तरुणाला शस्त्रक्रियेसाठी O- निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता होती. त्यावेळी, माणगाव येथील सूर्यकांत आडेलकर यांनी स्वतः बसने प्रवास करून गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी येथील रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. त्यांच्या या योगदानामुळे रुग्णाला जीवदान मिळाले. तसेच, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या कृष्णाजी वर्दम यांना O+ रक्तगटाच्या PCV ची तातडीने गरज असताना, रोहित राऊळ यांनी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले.
संघटना ठरतेय दुवा
‘युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी’ ही केवळ रक्तदानाच्याच नव्हे तर इतर वैद्यकीय गरजांसाठीही एक महत्त्वपूर्ण दुवा म्हणून काम करत आहे. संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना वेळीच रक्तदान आणि २४ तास उपलब्ध असणाऱ्या रुग्णवाहिकेची मदत मिळत आहे. संघटनेने सर्व रक्तदात्यांचे आभार मानले असून, त्यांच्या या कार्यामुळे अनेक रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले आहे.











