आय.सी.एस. महाविद्यालयात युवा संवादाचे आयोजन

खेड (प्रतिनिधी) – सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रमांतर्गत युवा संवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे करिअर कट्टाचे समन्वयक यशवंत शितोळे विशेष उपस्थित होते.
सुरुवातीला त्यांनी करिअर संसदेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील करिअर कट्टा अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांशी खुला संवाद साधत त्यांनी या उपक्रमांतर्गत राबवले जाणारे विविध कार्यक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी नेहमीच्या पदवीसोबत कोणते नवे पर्याय निवडू शकतात आणि त्यांचे भविष्यातील करिअर कसे घडवू शकतात याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.
यशवंत शितोळे यांनी माहिती तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांशी स्वतंत्रपणे संवाद साधत या शाखेसाठी करिअर कट्टा उपक्रमांतर्गत उपलब्ध असलेल्या विविध कोर्सेसची माहिती दिली. या संवादामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात संधी कशा साधता येतील याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. अनिता आवटी, करिअर कट्टा समन्वयक डॉ. सी. आर. साळुंखे, तसेच आयटीसीएस व बीएमएसचे समन्वयक डॉ. सचिन भोसले उपस्थित होते. विविध शाखांतील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन करिअर कट्टा समन्वयक डॉ. सी. आर. साळुंखे यांनी केले.