खेड (प्रतिनिधी) –
खेड तालुक्यातील जामगे ग्रामपंचायतीत दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. ग्रामसभेला ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती. या निर्णयामुळे गावात विकासात्मक कामांना गती मिळून आगामी काळात बक्षीस प्राप्त करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
या विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. देविका जाधव होत्या. उपसरपंच सौ. सुषमा शेलार, ग्रामपंचायत सदस्य श्री. रविकिरण कदम, श्री. विश्वास काणेकर, सौ. पूजा पवार यांच्यासह ग्रामपंचायतीचे सचिव श्री. अजय बोवणे यांनी अभियानाची माहिती ग्रामस्थांसमोर मांडली.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. चंद्रकांत कदम, पोलीस पाटील श्री. प्रसाद कदम, शाखा प्रमुख श्री. सतीश शिंदे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ बंधू-भगिनी या ग्रामसभेला उपस्थित होते. यावेळी शासकीय अधिकारी व कर्मचारीही उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती लता बाचीम, सौ. माधुरी खेडेकर, नोडल अधिकारी श्री. चंद्रकांत रेवाळे, मंडळ अधिकारी श्री. भोसले, कृषी सहाय्यक श्री. पाटील, आरोग्य सहाय्यक येवले, आशा सेविका सुरेखा जाधव, सी.आर.पी. सौ. प्रियांका दळवी, अंगणवाडी मदतनीस वैदेही काणेकर, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. अंकुश पवार, अजय डांगे, संगणक परिचालक श्री. राकेश मोरे आणि ग्रामरोजगार सहाय्यक सौ. कार्तिकी कदम यांचा समावेश होता.
या ग्रामसभेत ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यासाठी एकजूट दाखवली. गावाच्या प्रगतीसाठी आणि राज्य सरकारच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जामगे ग्रामपंचायत पुढाकार घेणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.













