नेमळे, (प्रतिनिधी): नेमळे येथील श्री देवी सातेरी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रौत्सवानिमित्त यंदा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. सोमवार, २२ सप्टेंबर रोजी घटस्थापने पासून सुरू झालेला हा उत्सव शनिवार, २७ सप्टेंबरपर्यंत अत्यंत उत्साहात पार पडला.
दरवर्षीच्या परंपरेनुसार, या नवरात्रौत्सवात नेमळेतील पंधरा वाड्यांमधील भजनी मंडळांनी सहभाग घेतला. रोज चार याप्रमाणे एकूण पंचवीस भजन मंडळांनी या सहा दिवसांच्या कार्यक्रमात आपली कला सादर केली.
उत्सवाची सांगता अधिक मनोरंजक करण्यासाठी भजन प्रेमी कला क्रीडा मित्र मंडळ, नेमळे यांच्या वतीने रविवार, २८ सप्टेंबर आणि सोमवार, २९ सप्टेंबर रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत नेमळे गावातील वारकरी मंडळाचा हरिपाठ झाला. त्यानंतर रात्री ८ ते ९ या वेळेत तारादेवी फुगडी ग्रुप, केळूस आणि गवळदेव बोर्डवे, कणकवली यांच्यात फुगडीची जुगलबंदी झाली, ज्याने उपस्थितांची मने जिंकली. रात्री ९ ते १० या वेळेत क्षेत्रपालेश्वर फुगडी ग्रुप, होडावडे यांनी फुगडी सादर केली. रात्री ११ ते १२ या वेळेत श्री देवी सातेरी ग्रुप, नेमळे यांनी दांडिया नृत्याने कार्यक्रमाला रंगत आणली.
सोमवार, २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता श्री देव मलेश्वर सातेरी फुगडी ग्रुप, नेमळे यांची फुगडी होणार आहे. या उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम याच दिवशी रात्री ठीक ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत:
प्रथम क्रमांक विजेत्यास: मानाची पैठणी
द्वितीय क्रमांक विजेत्यास: मिक्सर, टेबल फॅन, खुर्च्या, टी पॉय
इच्छुक स्पर्धकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन मंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन भजन प्रेमी मित्र मंडळाकडून करण्यात आले आहे.












