शिक्षण क्षेत्रातील आदिशक्ती – सौ. दिप्ती दिलीप यादव

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी २३ वर्षांची अखंड साधना

(राकेश कोळी)

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे सौ. दिप्ती दिलीप यादव. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माणी नं.१ येथील पदवीधर शिक्षिका म्हणून सध्या कार्यरत असलेल्या यादव यांनी गेल्या २३ वर्षांच्या सेवेत अध्यापन, साहित्य व सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रांत मोलाची कामगिरी बजावली आहे.

*शिक्षक ते ‘आदर्श शिक्षिका’*

१० जानेवारी १९७६ रोजी जन्मलेल्या आणि २१ जानेवारी २००२ रोजी शिक्षक म्हणून कार्यारंभ केलेल्या सौ. यादव यांनी देवघर विद्यामंदिरपासून सुरुवात केली. सुरुवातीच्या काळातच आदिवासी विद्यार्थ्यांचे केस स्वतः कापणे, त्यांना आंघोळ घालणे, शैक्षणिक साहित्य पुरवणे अशी माणुसकी जपणारी कामे त्यांनी केली. पुढे मोहाने ऐनवली, कुडोशी, खेड क्र.२, वाडीबीड आणि आता माणी नं.१ अशा शाळांमध्ये सेवाकाळात त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत शंभर टक्के निकाल, संगणकांची सुविधा, विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीचे उपक्रम अशा उपक्रमांमधून शिक्षण अधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला.

*विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलतेची जाग*

त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासातच नव्हे तर साहित्यिक उपक्रमांतही प्रेरणा मिळाली. त्यांच्या प्रेरणेने अनेक विद्यार्थी कवितालेखन करू लागले. वाडीबीड शाळेतील विद्यार्थिनींच्या कविता “माय मराठी” या पुस्तकात प्रकाशित झाल्या. एका विद्यार्थ्याच्या कवितेला छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कारही मिळाला.

*साहित्यसेवा*

सौ. यादव यांनी आजवर ५०० हून अधिक कविता, ५०० पेक्षा जास्त चारोळ्या, गझल व अभंग लेखन केले आहे. त्यांच्या कविता दिवाळी अंक, विविध वर्तमानपत्रे व साहित्य मंचांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. काव्य प्रेमी शिक्षक मंच रत्नागिरी जिल्ह्याच्या कार्यकारिणीत त्या काव्यलेखन उपक्रम प्रमुख म्हणून काम पाहतात. स्पर्धांचे परीक्षण करून नवीन लेखकांना प्रोत्साहन देणे, साहित्याची आवड वाढवणे हे कार्य त्या सातत्याने करतात.

*पुरस्कारांची गौरवमाला*

त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार, पत्रभूषण पुरस्कार, चारोळी सम्राज्ञी पुरस्कार, शिक्षक साहित्यरत्न पुरस्कार, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, सावित्रीबाई फुले राष्ट्रीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार, संत ज्ञानेश्वर साहित्यरत्न पुरस्कार यांसारखे ३० हून अधिक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

*छंदातून निर्माण होणारी प्रेरणा*

शिक्षिकेच्या जबाबदाऱ्या सांभाळतानाच टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे, विणकाम, शिवणकाम, तसेच वृत्तबद्ध काव्य, गझल, अभंग लेखन हे त्यांचे छंद आहेत. त्यातून मुलांमध्ये सर्जनशीलतेची बीजे रुजतात. “हर घर तिरंगा” उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कागदी बॅजेसचे कौतुक शिक्षण अधिकाऱ्यांनी केले होते.

*समाजकारणाशी नाळ*

शाळेत २५ हजार रुपयांचा शैक्षणिक उठाव करणे, लायन्स क्लब व इतर संस्थांकडून शैक्षणिक व क्रीडा साहित्य मिळवून देणे, १०७ वर्षीय आजोबांचा सन्मान करून त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करणे अशा उपक्रमांमुळे त्यांचे कार्य फक्त अध्यापनापुरते मर्यादित न राहता सामाजिक अंगानेही विस्तारलेले दिसते.

*आदर्श ठरणारी वाटचाल*

शिक्षण क्षेत्रात समर्पित वृत्ती, साहित्यिक योगदान आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेली सौ. दिप्ती यादव यांची कारकीर्द अनेक शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सर्जनशीलता आणि शैक्षणिक प्रगती यांचा संगम साधला आहे. खऱ्या अर्थाने “शिक्षण क्षेत्रातील आदिशक्ती” म्हणून त्यांचा गौरव केला जातो, तो अगदी योग्य ठरतो.