सावंतवाडी: नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून श्री देवी सातेरी मंदिर, नेमळे येथे भजनप्रेमी कला क्रीडा मंडळ, नेमळे यांच्या वतीने महिलांसाठी ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा मनोरंजक कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला होता. या रंगतदार कार्यक्रमात साक्षी सखाराम राऊळ हिने प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी जिंकत विजेतेपद पटकावले. ही पैठणी भजनप्रेमी कला क्रीडा मित्र मंडळाने पुरस्कृत केली होती.
सातेरी मंदिराच्या सभामंडपात तब्बल दोन तास चाललेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विजेत्या महिला आणि बक्षिसे:
या स्पर्धेतील अन्य विजेत्यांमध्ये रित्विका मिथुन घोगळे हिने द्वितीय क्रमांक पटकावत श्री देवी सातेरी मित्र मंडळ, देऊळवाडी पुरस्कृत मिक्सर हे पारितोषिक जिंकले. दिव्या दत्ताराम राऊळ हिला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आंबा बागायतदार रवींद्र दत्ताराम घोगळे पुरस्कृत टेबल फॅन मिळाले. चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते दिलीप भैरे पुरस्कृत प्लास्टिक खुर्च्या उत्कर्षा उमेश परब यांना, तर पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक नेमळे उपसरपंच सखाराम शिवराम राऊळ पुरस्कृत टी पॉय आर्या अजय मुळीक यांना देण्यात आले.
लकी ड्रॉ आणि बालकांसाठी संदेश:
’होम मिनिस्टर’ कार्यक्रमानंतर भजनप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने लकी ड्रॉ चा कार्यक्रम घेण्यात आला. यात यशश्री घोगळे हिने प्रथम क्रमांकाचे मोबाईल बक्षीस जिंकले. द्वितीय क्रमांक गंगा राऊळ हिला स्मार्ट वॉच, तृतीय क्रमांक निशांत मुळीक यास इस्त्री, चतुर्थ क्रमांक प्रणव नेमळेकर यास हॉट स्पॉट, तर पाचवा क्रमांक लता कोरगावकर हिला भिंतीवरील घड्याळ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. लकी ड्रॉ यशस्वी करण्यासाठी माध्यमिक शाळेचे शिक्षक उमेश राऊळ आणि सगुण नेमण यांनी सहकार्य केले.
याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे निवेदक प्रा. रुपेश पाटील यांनी उपस्थित बालकांच्या मातांना “मोबाईलपासून लहान मुलांना दूर ठेवा, त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका,” असा महत्त्वाचा सामाजिक संदेश दिला.
सूत्रसंचालन आणि आयोजनाची बाजू:
कार्यक्रमाचे रंगतदार निवेदन नेमळे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक राजेश गुडेकर यांनी केले, तर होम मिनिस्टर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी विविध खेळ आणि प्रश्न विचारून कार्यक्रमाची रंगत वाढविली. या कार्यक्रमाला देवस्थान स्थानिक उपसल्लागार समिती, नेमळे यांचेही महत्त्वाचे सहकार्य लाभले आणि भजनप्रेमी कला क्रीडा मित्र मंडळाच्या विशेष आयोजनातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.













