‘अभ्यासासोबत खेळ तेवढाच महत्त्वाचा’ – महेंद्र सावंत

बांदा । प्रतिनिधी : शालेय जीवनात अभ्यासासोबत खेळ तेवढाच महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात भरारी घ्यावी, संस्था म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी राहू, असे प्रतिपादन विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र सावंत यांनी केले. नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुलीच्या हँडबॉल संघाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेतील घवघवीत यशाबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पणदूर (ता. कुडाळ) येथे झालेल्या जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. या यशाबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना उपाध्यक्ष महेंद्र सावंत यांनी सांगितले की, आपल्या प्रशालेची एक वेगळी परंपरा असून गेली कित्येक वर्षे क्रीडा क्षेत्रात प्रशालेचे विद्यार्थी नेहमीच उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.

चारही गटांमध्ये नेत्रदीपक यश

या स्पर्धेत विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुली व मुले तसेच १७ वर्षांखालील मुले व मुली अशा चारही संघांनी सहभाग घेतला होता. यातील १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात वरवडे कणकवली संघावर ६ विरुद्ध १ गोल फरकाने दणदणीत विजय मिळवून जिल्हा विजेतेपद पटकावले. या विजयामुळे या संघाने कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे.

याचबरोबर, १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने जिल्हा उपविजेतेपद पटकावले, तर १४ वर्षांखालील मुलांचा संघ आणि १७ वर्षांखालील मुलांचा संघ यांनीही जिल्हा उपविजेतेपद मिळवले.

या सर्व संघांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक विनोद चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच, या संघांसाठी व्यवस्थापक म्हणून चंद्रलेखा सावंत व विद्या पालव यांनी काम पाहिले. मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव गुरुनाथ पेडणेकर, खजिनदार सदानंद कोलगावकर, संचालक सचिन दळवी, मुख्याध्यापक सुविद्या केरकर, सहशिक्षक संजय शेवाळे, सचिन पालकर, विनोद चव्हाण, विद्या पालव, मधुरा तांबे, चंद्रलेखा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. सचिव गुरुनाथ पेडणेकर आणि खजिनदार सदानंद कोलगावकर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह. शिक्षक संजय शेवाळे यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक सुविद्या केरकर यांनी मानले.