आंजनारी शिखरेवाडी येथील घटना
लांजा( प्रतिनिधी) घराच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले ५ लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना लांजा तालुक्यातील आंजनारी शिखरेवाडी येथे घडली आहे.
दिनांक १२ मे २०२५ रात्री ८ ते दिनांक २० सप्टेंबर २०२५ दुपारी १ या कालावधीत हा चोरीचा प्रकार घटना घडला असून याबाबतची तक्रार श्रीमती शुभांगी यशवंत शिखरे (वय ४५, राहणार आंजनारी शिखरेवाडी) यांनी लांजा पोलिस ठाण्यात केली आहे. शुभांगी शिखरे यांनी आपल्या घरामध्ये असलेल्या कपाटाच्या लॉकरमध्ये सदरहू सोन्याचे दागिने ठेवले होते. यामध्ये २ लाख ५० हजार रुपये किमतीचे २५ ग्रॅम आणि हा ९६० मिली वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र त्याचप्रमाणे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम ५२० मिली वजनाचा सोन्याचा हार, ९० हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याची कर्णफुले, २५ हजार रुपये किमतीची दोन ग्रॅम ५०० मिली वजनाची अंगठी तसेच ३० हजार रुपये किमतीची ३ ग्रॅम १०० मिलि वजनाची अंगठी असा एकूण ५ लाख ४५ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या कपाटाचे लॉकर मधून लंपास केला आहे .
दागिने चोरीला गेल्याची बाब शुभांगी शिखरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आजूबाजूला तसेच नातेवाईक घरातील माणसे यांच्याकडे चौकशी केली होती. त्यानंतर त्यांनी आज बुधवारी १ ऑक्टोबर रोजी लांजा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे .
या घटने प्रकरणी लांजा पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे अधिक तपास करत आहेत.











