कार चालक अद्याप फरारच शोध घेण्याचे पोलीसांपुढे आव्हान
तिची महिलेची प्रकृती स्थिर खासगी रूग्णालयात उपचार सुरू
राजापूर | प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्गावर लिप्ट देण्याच्या बहाण्याने त्या महिलेला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार चालकाने त्या महिलेकडील सुमारे ३३ हजाराचा ऐवज लांबविल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी त्या महिलेच्या फिर्यादीवरून राजापूर पोलीसांनी अज्ञात कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान त्या महिलेची प्रकृती आता स्थीर असून तीच्यावर रत्नागिरीतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अशा प्रकारे
महामार्गावरच महिलेला लुटण्याचा प्रयत्न झाल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण असून त्या कार चालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलीसांपुढे ठाकले आहे.
मुंबई गोवा महामार्गावर कोदवली बस स्टॉपजवळ राजापूर येथे जाण्यासाठी थांबलेल्या रश्मी प्रभाकर चव्हाण वय ६५ या महिलेला एका अज्ञात कारचालकाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने फसवून तिच्या डोक्यात रॉडने हल्ला करत लुबाडण्याचा प्रयत्न केल्याहचा धक्कादायक प्रकार गुरुवारी ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ०६.०० ते ०६.१५ वाजेच्या दरम्यान घडला.
या घटनेमुळे राजापूर परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोदवली तरळवाडी येथील रहिवासी असलेल्या रश्मी प्रभाकर चव्हाण (वय ६५, व्यवसाय गृहिणी) या गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोदवली बस स्टॉप, मुंबई-गोवा हायवे येथे राजापूरला जाण्यासाठी थांबल्या होत्या. त्याच वेळी एका अज्ञात कारचालकाने कार थांबविली व त्यांच्याजवळ येऊन त्यांना राजापूर येथे सोडतो, असे सांगितले. चव्हाण या विश्वास ठेवून त्या कारमध्ये बसल्या. मात्र, कार चालकाने राजापूर येथे गाडी न थांबवता त्याने गाडीचे ‘टायर अंकीता हॉटेलजवळ देण्याचे कारण सांगून गाडी पुढे नेत तुम्हाला येताना राजापूर येथे सोडतो’ असे सांगत गाडी अंकीता हॉटेलच्या दिशेने नेली. हॉटेल अंकीताकडे गाडी नेल्यानंतर तिथे टायर न देता, त्याने हॉटेल ग्रीनपार्क समोरून गाडी पुन्हा राजापूरकडे वळवली. राजापूरच्या दिशेने येत असताना गंगातीर्थ येथील पेडणेकर होमस्टेच्या पुढील वळणावर उन्हाळे येथे सायंकाळी ०६.१५ वाजण्याच्या सुमारास आरोपीने अचानक चव्हाणबाई यांच्या डोक्यात रॉड मारला. या हल्ल्यामुळे त्या भेदरलेल्या असतानाच आरोपीने त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम ५०००/- रुपये असलेली पर्स, व्हीवो कंपनीचा मोबाईल आणि त्यांच्या कानातील ०४ ग्रॅम वजनाची सोन्याची बुगडी हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पोबारा केला.
पीडित रश्मी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात आरोपीने एकूण ३३,०००/- रुपयांचा ऐवज चोरला आहे. यामध्ये ५०००/- रुपये रोख रक्कम, सुमारे २५,०००/- रुपये किमतीची ४ ग्रॅम वजनाची सोन्याची एक बुगडी आणि ३०००/- रुपये किमतीचा एक सिल्व्हर रंगाचा व्हिवो कंपनीचा मोबाईल यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
या महिलेवर सध्या रत्नागिरीतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान पोलीसांकडून तातडीने महामार्गावरील काही पेट्रोलपंप, हॉटेल यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून मोबाईल लोकेशनही तपासले जात आहे. या आरोपीचा लवकरात लवकर पोलीस शोध घेतील असे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सांगितले.












