उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा फक्त राजकारणासाठी; एकनाथ शिंदे यांची सभा प्रेरणादायी – योगेश कदम

दापोली (राकेश कोळी)  – शिवसेनेचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या कल झालेल्या दसरा मेळाव्यावर टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचे विचार रुजवण्यासाठी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती आणि या मेळाव्याद्वारे तरुणांच्या हृदयात हिंदुत्वाची बीजे पेरली जात होती. परंतु, योगेश कदम यांच्या मते, सध्या उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा फक्त टीका आणि टोमणे मारण्यासाठीच वापरला जात आहे.
योगेश कदम यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यापासून कोणालाही प्रेरणा मिळत नाही, कोणालाही ऊर्जा मिळत नाही. त्यांच्या भाषणातून केवळ राजकारण करण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. त्याउलट, एकनाथ शिंदे यांनी दसऱ्याच्या निमित्ताने घेतलेल्या दसरा मेळाव्यात मांडलेले विचार तरुणांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरले आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्याचे आणि शेतकऱ्यांसाठी कार्य करण्याचे संदेश एकनाथ शिंदे यांनी दिले. यावेळी योगेश कदम यांनी पुढे सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी सत्कारदेखील नाकारला, जे एक संवेदनशील नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण त्यांनी काल दाखवून दिले. याउलट, उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणातून टीका आणि टोमणे मारणारा नेता कसा असावा हे महाराष्ट्रासमोर ठळकपणे दाखवून दिले आहे.
योगेश कदम यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कामगिरीवर देखील टीका केली. ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिका तीस वर्ष ताब्यात असूनही उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसासाठी काहीही केले नाही. मराठी माणसाच्या हिताचा निर्णय न घेतल्यामुळे मराठी माणूस मुंबईतून बाहेर पडला आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले, तरीही मुंबई आणि मराठी माणसासाठी काही ठोस काम केले नाही. कदम यांच्या मते, येत्या निवडणुकीत मराठी माणूस उद्धव ठाकरे यांना त्यांच्या योग्य जागेवर बसवेल. ठाकरे हे आडनाव आहे, पण ‘ठाकरी बाणा’ ही मूल्यवृत्ती एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. जनता देखील त्या ‘ठाकरी बाण्यासोबत’ राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.