‘ओंकार’ हत्तीला दोन – तीन दिवसात जेरबंद करणार

जिल्हा उप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांचा शेतकऱ्यांना विश्वास

स्थानिक आक्रमक : हत्तीकडून नुकसान सत्र सुरूच

बांदा l प्रतिनिधी :कास – सातोसे भागात ओंकार हत्ती सध्या धुमाकूळ घालत आहे. भातशेतीसह केळी, नारळ, पोफळी बागायतीचेही अतोनात नुकसान सुरू आहे. हत्ती पकड प्रश्नांवरून कास ग्रामस्थानी जिल्हा उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांना घेराव घालत धारेवर धरले. हत्ती पकड मोहिमेची जय्यत तयारी सुरू असून वनताराची टीम दाखल झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसात हत्ती पकड मोहीम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला.

 

ओंकार हत्ती सध्या सातोसे, मडूरा, कास गावात स्थिरावला असून भातशेती, केळी, नारळ, पोफळी बागायतीचे अतोनात नुकसान सुरू आहे. हत्ती पकड मोहिमेची पाहणीसाठी आलेल्या उपवनसंरक्षक मिलिश कुमार यांना कास ग्रामस्थांनी जाब विचारला. हत्ती पकड मोहिमे संदर्भात नेमकी कोणती कार्यवाही सुरू आहे ? असा सवाल रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी केला. यावर मिलीश कुमार यांनी हत्ती पकड मोहीम साठी खास प्रशिक्षित टीम दाखल झाली आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. येत्या दोन – तीन दिवसात ओंकार हत्तीला पकडण्यात येईल, असे स्पष्ट केले.

 

हत्ती हा ताकदवान व वजनदार प्राणी असल्यामुळे हत्ती पकड मोहीम राबवताना पूर्ण नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम घटनास्थळी अभ्यास करत आहे.

 

हत्तीकडून होणाऱ्या नुकसानी बाबत सरपंच प्रवीण पंडित यांनी त्यांचे लक्ष वेधले. वनविभागाचे कर्मचारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कागदपत्रे जमा करतील. तसे आदेशही दिलेले आहेत. सामाईक क्षेत्रासाठी शेतकऱ्यांचे हमीपत्र घेऊन त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. ई पीक नोंदणीत संबंधित पिकाची नोंद नसेल तर महसूल विभागाकडून नोंदणी करून घेणार. सत्य परिस्थिती पाहून पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल, असे मिलिश कुमार यांनी सांगितले.

 

गावात लहान मुले विनाकारण हत्ती पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. ही खूप धोक्याची बाब आहे. हत्ती आक्रमक झाल्यास त्याला रोखणे अशक्य आहे. त्यामुळे गावातील लहान मुले, वृद्धांना हत्ती पाहण्यासाठी येऊ नये यासाठी जनजागृती करा, अशी विनंती मिलीश कुमार यांनी केली.

 

*ओंकार कडून ट्रॅक्टरची नासधूस*

कास – चाळ भागात शेतकरी शांताराम राणे यांचा शेतात उभा करून ठेवलेल्या ट्रॅक्टरची हत्तीने नासधूस केली. यात राणे यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासमोर शेती नांगरणीची समस्या उभी राहिली आहे. वनविभागाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी सरपंच प्रवीण पंडित यांनी केली आहे.

 

*हत्ती पकड मोहीम त्वरीत राबवा*

मडूरा उप सरपंच बाळू गावडे यांनीही वनपाल पी. एन. प्रताप यांना काळा आंबा परिसरात जाब विचारला. झालेले नुकसान व मिळणारी भरपाई यात खूप तफावत आहे. हत्तीचा तातडीने बंदोबस्त करा. हत्तीला पाहण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांवर निर्बंध घाला. हत्ती पकड मोहीम तातडीने राबवा, अशी मागणी केली. यावेळी वनपाल प्रताप यांनी हत्ती पकड मोहिमेची कार्यवाही वेगात सुरू असून चार दिवसात हत्तीला पकडण्यात येईल असे सांगितले.

———