आढावा बैठकीत खासदार सुनील तटकरे यांच्या अधिकाऱ्यांना सुचना
मंडणगड : प्रतिनिधी – मंडणगड तालुका विकासाच्या वाटेवर अग्रेसर होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणातील सर्व अधिकाऱ्यांनी तालुक्याच्या पायाभुत सुविधा व प्रश्न सोडवण्यासठी आग्रक्रम द्या, निष्काळजीपणा व कामचुकारपणा खपवून घेणार नसल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले.
मंडणगड नगरपंचायत सभागृहात 6 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजीत आढावा बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आढावा घेताना त्यांनी अनेक विषयांवर अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
या सभेस प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अक्षय ढाकणे, गटविकास अधिकारी सुनिल खऱात, मुख्याधिकारी महादेव रोडगे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, महिला अध्यक्ष साधना बोत्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण, भाई पोष्टूरे, तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, संदीप राजपुरे, नगराध्यक्षा सोनल बेर्डे, स. तू. कदम, जिल्हा परिषद सदस्या सौ. नेहा जाधव, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांच्यासह सर्व खात्यांचे अधिकारी व पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी पाणी पुरवठा विभागाचा आढावा घेताना तालुक्यातील नळपाणी योजनांचा आढावा घेतला. तालुक्यात 102 जलजीवन मिशन योजना आहेत. 44 कोटीचा आराखडा असून त्यातील 25 कोटी रु. खर्च झाला असल्याची माहीती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी बाणकोट प्रादेशिक नळपाणी योजना, आंबवली, जावळे मधील नळपाणी योजना, कुडुक खुर्द नळपाणी योजना, मंडणगड शहर नगरपंचायत पाणी योजना या विषयी नागरीकांनी गंभीर समस्या उपस्थित केल्या याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करताना शक्य तितक्या लवकर विविध समस्या मार्गी लावण्याच्या सुचना यावेळी खासदार श्री. तटकरे यांनी यावेळी दिल्या. नगरपंचायत नळपाणी योजनेच्या डीपीआर प्रस्ताव कागद पात्रांत प्रशासकी स्तरावर निघणाऱ्या त्रुटी नगरपंचायत प्रशासनाला पूर्ण करता येत नाही. त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम यंदाच्या हंगामात पूर्ण होईल असे बघा, अशा सूचना केल्या. महावितरणच्या प्रलंबित कामांबाबत कानउघडणी करताना अधिकाऱ्यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले. सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा घेताना एएमसी अंतर्गत खड्डे बुजवण्याच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
यावेळी प्रशासकीय यंत्रणांतील सर्व अधिकाऱ्यांना तालुक्याचे प्रश्न संवेदनशीलपणे हातळण्याच्या सुचना खासदार श्री. तटकरे यांनी दिल्या शिवाय आगामी काळात अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कामात सुधारणा अपेक्षित असल्याचे खडे बोलही त्यांनी यावेळी सुनावले.











