सावंतवाडी । प्रतिनिधी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता आरक्षण कार्यक्रम निश्चित झाला असून, या अनुषंगाने सावंतवाडी तालुक्यात आरक्षण सोडत काढण्याबाबत निर्देश आले आहेत. त्यानुसार, सावंतवाडी तालुक्यातील गट क्र. ७७ ते ९४ साठीची आरक्षण सोडत प्रक्रिया येत्या सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
ही आरक्षण सोडत प्रक्रिया सकाळी ११.०० वाजता तहसीलदार कार्यालय, सावंतवाडी येथे विशेष सभेत पार पडणार आहे.
मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार सावंतवाडी श्रीधर पाटील यांनी या संदर्भात एक प्रेस नोट जारी केली आहे. या नोटद्वारे त्यांनी सावंतवाडी तालुक्यातील सर्व नागरिकांना या विशेष सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही आरक्षण सोडत अतिशय महत्त्वाची असून, यामध्ये गट-गणांचे स्वरूप निश्चित होणार आहे.












