कुडाळ:-गोवेरी भगतवाडी येथे बिबट्याने शेतकरी गुंडू लक्ष्मण पालकर यांच्या शेळीवर प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शेळीवर बिबट्याने झडप घातल्याचे पाहून पालकर यांनी आरडाओरड केली. त्यांच्या आवाजाने गावातील लोक मदतीसाठी धावून आले आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे बिबट्याला तेथून हुसकावून लावण्यात आले. मात्र तोपर्यंत शेळी जागीच मृत झाली होती.
या घटनेची माहिती ग्रामपंचायत सदस्य मोहन जाधव यांनी तत्काळ वनविभागाला दिली. त्यानुसार वनपाल श्री. सूर्यकांत सावंत, वनरक्षक श्री. सचिन पाटील, प्रसाद पाटील, व वनसेवक यशवंत कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला. अधिकाऱ्यांनी शेळीच्या नुकसानीबाबत एक महिन्याच्या आत भरपाई देण्याचे आश्वासन दिले.
या वेळी भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, प्रभारी सरपंच सौ. स्वरा गावडे, तन्मय वालावलकर, मोहन जाधव, बब्रुवान भगत, दिगंबर गोवरकर, बाबू गावडे, एकनाथ गोवेरकर, आबा पालकर, केशव गावडे, व शरद निकम आदी उपस्थित होते.










