कोजागरी कवी संमेलनात कोकणी कवींची नाममुद्रा!

​सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकणातील अनेक कवींनी साहित्य प्रवाहात आपली ‘नाममुद्रा’ उमटवली असून, आजही कोकणात सकस कविता लिहिली जात आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांनी केले.
​सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरच्या कवी केशवसुत सभागृहात सिंधुदुर्ग साहित्य संघ व श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोजागरी कवी संमेलन’ उत्साहात पार पडले.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा. डॉ. शरयू आसोलकर बोलत होत्या. ज्येष्ठ कवयित्री डॉ. सई लळीत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
​मालवणी बोलीची ‘लज्जत’ वाढवणारी कविता:
डॉ. सई लळीत यांनी यावेळी बोलताना सांगितले की, कविता आपणाला जगवते व प्रेरणा देते. मालवणी बोलीभाषा मराठी भाषेची लज्जत अधिक वाढवते, असे सांगत त्यांनी सादर केलेल्या मालवणी कवितेला रसिकांची भरभरून दाद मिळाली.
​कवी-कवयित्रींचा सन्मान व काव्यवाचन

यावेळी ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो, अजय कांडर, स्नेहा कदम यांच्यासह पुरस्कार जाहीर झालेल्या व पुस्तके प्रकाशित झालेल्या अनेक कवी-कवयित्रींचा सन्मान करण्यात आला. दुसऱ्या सत्रात मुकुंद पिळणकर, रुजारिओ पिंटो, संध्या तांबे, आर्या बागवे, प्रा. भाऊ गोसावी, स्मिता नातू, मधुकर जाधव, सुस्मिता राणे, स्नेहा कदम, दीपक पटेकर, कल्पना बांदेकर, नकुल पार्सेकर, सत्यवान साटम, आर्या खानोलकर, सिद्धार्थ तांबे, महेश सावंत, विजय ठाकर, अजय कांडर, मंजिरी मुंडले, रामचंद्र शिरोडकर, प्रा. शालिनी मोहळ, लक्ष्मी धारगळकर, ऋतुजा सावंत-भोसले यांच्यासह अनेक कवी-कवयित्रींनी उत्स्फूर्त काव्यवाचन केले.
​सर्वोत्कृष्ट कविता पारितोषिक
आर्या खानोलकर आणि तन्वी परब यांच्या कवितांना सर्वोत्कृष्ट कवितांचे ‘डॉ. वसंत सावंत स्मृती पारितोषिक’ प्रदान करून संमेलनाध्यक्ष डॉ. शरयू आसोलकर यांनी प्रत्येकी ५०० रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला.