सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी संस्थानची ‘गंजीफा’ ही जगप्रसिद्ध हस्तकला नुकतीच भारतीय डाक विभागाने आपल्या टपाल तिकिटावर समाविष्ट करून या कलेला एक अनोखा सन्मान मिळवून दिला आहे. सावंतवाडीच्या राजपरिवाराने ही हस्तकला टिकवून ठेवण्यात आणि तिचा प्रसार करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. याच महत्त्वपूर्ण सन्मानाचे औचित्य साधून अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेने युवराज श्री. लखमराजे आणि युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे यांचे नुकतेच अभिनंदन केले.
याप्रसंगी युवराज लखमराजे यांनी अभिनव फाउंडेशनकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे चालू असलेल्या जनहित याचिकेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. युवराज लखमराजे यांनी फाउंडेशनच्या या प्रयत्नांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी अभिनव फाउंडेशनचे किशोर चिटणीस, अण्णा म्हापसेकर, जितेंद्र मोरजकर, राजू केळुसकर, डॉ. प्रसाद नार्वेकर आणि तुषार विचारे हे उपस्थित होते.













