* मुंढेतर्फे चिपळूण येथील बैलगाडा चालक दिवंगत वसंत मोहिते यांच्या बैलाचे निधन!
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुंढेतर्फे चिपळूण येथील रहिवासी व रत्नागिरी जिल्हा समाजकल्याण समितीचे माजी सभापती मनोहर मोहिते यांचे बंधू बैलगाडा चालक दिवंगत वसंत मोहिते यांचा शर्यतीचा हुकमी एक्का अर्थात बैलगाडा शर्यतीतील बादशहा त्यांचा बैल ‘कोश्या’ हा दि.१७ ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन पावला. कोशाच्या निधनाने तळसर मुंढे पंचक्रोशीत बैलगाडा चालक व शेतकऱ्यांत हळहळ व्यक्त केली जात आहे.
माजी सभापती मनोहर मोहिते यांचे बंधू दिवंगत वसंत गणपत मोहिते यांची अनेक वर्षांपासून खिलारी बैलजोड्या तसेच बैलगाडा आहे. दिवंगत वसंत मोहिते यांच्या पश्चातही कुटुंबीयांनी बैलांचे पालन पोषण सुरूच ठेवले. पंचक्रोशीतील एक नामवंत व मोठे शेतकरी म्हणून हे कुटुंब ओळखले जाते. बैलगाडी आणि बैलगाडी शर्यतीची प्रचंड आवड या कुटुंबाला, विशेषतः दिवंगत वसंत मोहिते यांना होती. त्यामुळेच त्यांनी निरनिराळ्या बैलजोड्या आपल्या हयातीत वापरल्या. त्यापैकी अगदी सुरुवातीपासून आपल्या कुटुंबामध्ये सांभाळलेला कोश्या हा एक महत्त्वाचा बैल होता. गेली २०-२५ वर्ष तो बैलगाडी शर्यतीच्या रणांगणावर कायम टक्कर देत होता. केवळ रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र वेगवेगळ्या ठिकाणी बैलगाड्या शर्यतींमध्ये तो उतरला होता. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मैदाने या कोशाने गाजवलेले आहेत. ज्या मैदानात कोश्याची बैलगाडी असेल त्या ठिकाणी दिवंगत वसंत मोहिते यांच्या बैलगाडीचा नंबर नक्की असायचा. इतके अतूट असे विजयाचे नाते निर्माण झालेले होते. कोश्या या बैलाने चिपळूण तालुक्यातील विविध ठिकाणी पार पडणाऱ्या बैलगाडी शर्यतीत पहिले क्रमांक काढले आहेतच, त्याखेरीज रत्नागिरी जिल्ह्यातील ही वेगवेगळ्या ठिकाणी आणि महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ,पंढरपूर पुसेगाव अशा अनेक मान्यवर म्हणवल्या जाणाऱ्या बैलगाडी शर्यतीमध्ये या बैलाने सहभाग घेतलेला होता. शिवाय त्या त्या ठिकाणी पहिल्या तीन नंबरमध्ये तो नक्की येत असे. अशी खात्री दर्शकांनाही असे.
मुंढे गावातील सर्व गावकरी या बैलाच्या पाठीमागे असत. बैल वृद्ध झाला तरी त्याचा सांभाळ या कुटुंबाने अतिशय चांगल्या प्रकारे केला होता. मोहिते बंधू मनोहर मोहिते, सुभाष मोहिते, महेंद्र मोहिते व त्यांचे इतरही बंधू यांनी शेतीकरिता आणि शर्यतीकरिता बैलजोडी जोपासल्या. कुटुंबामध्ये शेती शिवाय बैलगाडी शर्यतीमध्ये अतिशय आक्रमकपणे या बैलाने कामगिरी बजावलेली आहे. त्यामुळे त्याच्यावर सर्वांचे विशेष प्रेम होते. अखेर वृद्धापकाळाने या बैलाचे निधन झाले. त्याच्या अंत्यसंस्कारला सुद्धा तळसळ मुंढे पंचक्रोशीतील बहुसंख्या शेतकरी आणि बैलगाडा चालक-मालक उपस्थित होते.












