खेड (प्रतिनिधी) : लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने भाऊबीज दिनानिमित्त समाजहिताचा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. “निराधारांना आधार” या संकल्पनेतून दिनांक २३ ऑक्टोबर रोजी श्रीमती राजश्री शिगवण या महिलेस त्यांच्या भावाकडून भेट म्हणून महिनाभराचा जिन्नस देण्यात आला.
हा उपक्रम दुबईस्थित यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक बशीर भाई हजवाणी यांच्या हस्ते पार पडला. सामाजिक जाणीवेतून लायन्स क्लबकडून राबविले जाणारे असे उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारे असून, अशा कृतीमुळे लायन्स क्लब नेहमीच कौतुकास पात्र ठरतो, अशा भावना बशीर भाई हजवाणी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष लायन रोहन विचारे, झोन चेअरमन लायन मिलींद तलाठी, उपाध्यक्ष लायन अविनाश दळवी, तसेच सदस्य लायन राजा जोयसर, लायन शैलेश धारिया, लायन परेश चिखले आणि लायन प्रविण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
भाऊबीज या सणाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजातील दुर्बल घटकांसाठी आशेचा किरण ठरला असून, लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या सामाजिक कार्याचे हे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.













