मंदार एज्युकेशन सोसायटीत पैशांवरून ‘राडा’

 चेअरमन मंदार शिंदेंना शिवीगाळ; धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्ह
चिपळूण (प्रतिनिधी) : कामाच्या बिलाच्या पैशांवरून एका व्यक्तीने थेट शैक्षणिक संस्थेत घुसून चेअरमनलाच शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पैशांची मागणी करत आरोपीने चेअरमनच्या अंगावर धाव घेत, मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या दोघांनाही धक्काबुक्की केली.
याप्रकरणी, मंदार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंदार राजाराम शिंदे (५२, रा. कोळकेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपी सतिश बाळकृष्ण शिंदे (रा. कोळकेवाडी, ता. चिपळूण) याच्यावर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:४५ वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथील मंदार एज्युकेशन सोसायटीच्या आवारात घडली. आरोपी सतिश शिंदे याला त्याच्या रंगकामाच्या व सिव्हील कामाच्या बिलाचे पैसे फिर्यादी मंदार शिंदे यांच्याकडून घ्यायचे होते.
यासाठी फिर्यादींनी आरोपीला दि. २५ ऑक्टोबर रोजी बोलावले होते, मात्र त्यावेळी तो आला नाही. दि. २७ ऑक्टोबर रोजी आरोपीला बोलावले नसतानाही तो थेट संस्थेच्या आवारात आला आणि मोठमोठ्याने आरडाओरड करू लागला. आवाज ऐकून चेअरमन मंदार शिंदे हे त्यांच्या केबिनमधून बाहेर आले. त्यावेळी आरोपीने त्यांना “माझ्या कामाच्या बिलाचे पैसे कधी देणार?” अशी विचारणा करत आरडाओरड सुरूच ठेवली. फिर्यादींनी त्याला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला. “तुम्हाला २५ तारखेला बोलावले होते तेव्हा तुम्ही आला नाहीत, आज तुम्हाला बोलावले नसतानाही तुम्ही आला आहात. तुम्ही आता दि. १२ नोव्हेंबर रोजी या,” असे फिर्यादी मंदार शिंदे यांनी आरोपीला सांगितले.
फिर्यादीचे हे बोलणे ऐकताच आरोपी सतिश शिंदे याचा राग अनावर झाला. त्याने मंदार शिंदे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि “तुम्हाला मारतो” अशी धमकी देत तो त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून आला. हा गंभीर प्रकार पाहून तेथे उपस्थित असलेले अवधुत पाटील आणि विजू केळस्कर हे मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले. मात्र, संतापलेल्या आरोपीने त्या दोघांनाही हाताने धक्काबुक्की केली आणि गोंधळ घातला.
घडलेल्या या संपूर्ण प्रकारानंतर मंदार शिंदे यांनी सायंकाळी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सतिश शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शैक्षणिक संस्थेत घुसून चेअरमनलाच धमकी दिल्याच्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.