डॉ. रेड्डी खून प्रकरणातील आणखी एकाला बांद्यात अटक

 

बांदा सीमेवरील हॉटेलमधून संशयित ताब्यात

सिंधुदुर्ग एलसीबी आणि बंगळूर पोलिसांची संयुक्त कारवाई

बांदा : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खळबळ उडवून देणाऱ्या डॉ. श्रीनिवास रेड्डी खून प्रकरणात बांदा येथून काल रात्री उशिरा आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. बंगळूर पोलिस आणि सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने बांदा सीमेवरील एका हॉटेलमध्ये संयुक्त कारवाई करत या संशयिताला अटक केली. ही कारवाई रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

 

*प्रॉपर्टीच्या वादातून खून*

प्राप्त माहितीनुसार, सदर खून प्रकरण प्रॉपर्टीच्या वादातून घडले असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. डॉ. रेड्डी यांचा प्रॉपर्टी वादातून खून झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे. खून झालेल्या डॉ. रेड्डी यांचा मृतदेह साळीस्ते येथे तर त्यांची गाडी तिलारी येथे पोलिसांना आढळून आली होती. या घटनेनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.

 

*नऊहून अधिक आरोपींचा सहभाग*

या खून प्रकरणात नऊ पेक्षा जास्त आरोपींचा सहभाग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने यापूर्वीच चौघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सिंधुदुर्ग व बंगळूर पोलिसांकडून या खून प्रकरणाचा तपास सुरु आहे.

 

*बांदा सीमेवरील हॉटेलमधून अटक*

तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त तपास पथकाने बांदा सीमेवर असलेल्या एका हॉटेलमध्ये काल रात्री छापा टाकला. या कारवाईत रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात यश आले.

 

*रक्ताने माखलेले कपडे ताब्यात*

डॉ. रेड्डी यांचा खून करून मृतदेह साळीस्ते येथे टाकल्यानंतर रक्ताने माखलेले कपडे बांदा – पत्रादेवी सीमेनजीक एका झुडुपात फेकले. संशयिताने ते कपडे दाखविल्या नंतर पोलिसांनी ते ताब्यात घेतले. सायंकाळी ६ वाजल्या पासून एलसीबी पथक संशयिताच्या मागावर होते. अखेर रात्री उशिरा त्याला ताब्यात घेतले.

 

*खून तपासला गती येणार*

आणखी एका संशयिताच्या अटकेमुळे या खून प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध घेण्यास आणि संपूर्ण गुन्ह्याची साखळी उलगडण्यास मदत मिळणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पथकाकडून ताब्यात घेतलेल्या संशयिताची कसून चौकशी सुरू आहे.