लांजा तालुका भाजपाची मागणी, निवडणूक अधिकारी नगरपंचायत लांजा यांना निवेदन
लांजा( प्रतिनिधी) लांजा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये मतदान केंद्रावर नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता गोंडेसखळ येथील प्राथमिक शाळा या ठिकाणी नवीन मतदान केंद्राची स्थापना करावी, अशी मागणी लांजा तालुका भाजपाच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन निवडणूक अधिकारी, नगरपंचायत लांजा यांना सादर करण्यात आले आहे .
या निवेदनात म्हटले आहे की, आगामी काही काळात लांजा नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. लांजा नगरपंचायत प्रभाग क्रमांक २१ मध्ये गोंडे सखलवाडी आहे. सदर वाडी मतदान केंद्रापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. डोंगराळ भागातून रस्ता आहे. तसेच वाडीतील वयस्कर, ज्येष्ठ नागरिक व अन्य मतदारांना यामुळे मतदान केंद्रापर्यंत येऊन मतदान करणे कठीण होते. त्यामुळे त्याचा थेट परिणाम हा मतदानावर होतो. मतदानाची टक्केवारी घसरते. तसेच या प्रभागामध्ये गोंडेसखलवाडीत सुमारे ३५० मतदार आहेत.
या वाडीमध्ये प्राथमिक शाळा गोंडेसखळ ही आहे .त्यामुळे या शाळेमध्येच नवीन मतदान केंद्र सुरू करावे अशी मतदारांची मागणी आहे .जेणेकरून मतदानाची टक्केवारी देखील वाढेल आणि लोकांना देखील सोयीचे होईल.त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी आणि मतदारांची गैरसोय दूर करावी अशी मागणी भाजपाच्या वतीने तालुका अध्यक्ष शैलेश खामकर आणि शहर अध्यक्ष मयूर शेडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.












