इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीतर्फे नगरपरिष्द सफाई कामगारांना दिवाळी भेट 

सावंतवाडी । प्रतिनिधी : इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सावंतवाडी नगरपरिषदेच्या ६० सफाई कामगारांना दिवाळीनिमित्त खास भेटवस्तू देण्यात आली. या कामगारांना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी स्वेटर तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले.

सावंतवाडी नगरपालिकेच्या या सफाई कामगारांना इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने दिवाळीच्या काळात वेगवेगळ्या भेटवस्तू आणि मिठाई देत आहे. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता वर्षभर शहर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या या कामगारांना यावेळी स्वेटरचे वाटप करण्यात आले.

आपली आठवण ठेवून कोणीतरी आपल्याला दिवाळी भेटवस्तू देत असल्याचा मनस्वी आनंद या कामगारांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. हा उपक्रम राबवल्यामुळे कोणाला तरी आनंद देऊ शकल्याचे समाधान इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होते.

या स्तुत्य उपक्रमावेळी इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षा मृणालिनी कशाळीकर, सेक्रेटरी भारती देशमुख, खजिनदार देवता हावळ, संपादक नेत्रा सावंत, तसेच सदस्या अनिता भाट, दर्शना रासम, शुभदा करमरकर, वैभवी शेवडे, सुहानी तळेगावकर, दर्शना बाबरदेसाई, सायली दुभाषी, निता रेडीज, मिनल नाईक आदी पदाधिकारी आणि सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गरजू कामगारांना मदत करण्याचा हा उपक्रम सावंतवाडी शहरासाठी एक आदर्श ठरला आहे.