सांवतवाडी । प्रतिनिधी : ‘ऑन कॉल रक्तदाते संस्था’ सिंधुदुर्गच्या १३ नियमित रक्तदात्यांनी एकाच दिवशी ५ गंभीर रुग्णांना रक्तदान करून त्यांना जीवनदान दिले. गोव्यातील गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी, सिंधुदुर्ग येथील एस. एस. पी. एम. लाईफ टाइम हॉस्पीटल रक्तपेढी पडवे, तसेच राणी जानकीबाई रुग्णालय, सावंतवाडी अशा विविध रुग्णालयांमध्ये रक्ताची तातडीची गरज असलेल्या पेशंट्ससाठी या स्वयंसेवकांनी तत्परता दाखवत बहुमोल योगदान दिले.
*गोवा बांबोळी येथे बायपास सर्जरीसाठी मदत*
बांबोळी येथे बायपास सर्जरीसाठी एका पेशंटला एबी पॉझिटिव्ह रक्ताची तातडीची आवश्यकता होती. ही माहिती मिळताच ‘ऑन कॉल रक्तदाते संस्थे’चे नियमित रक्तदाते आनंद देसाई, भूषण मालवणकर, जयदीप पडवळ, रामचंद्र भालेकर, शेखर दळवी आणि ‘आभाळमाया ग्रुप’चे सदस्य संदीप कर्पे यांनी त्वरित जीएमसी रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले.
*एस. एस. पी. एम. हॉस्पीटलमध्ये ओ पॉझिटिव्ह रक्ताचा पुरवठा*
त्याच दिवशी एस. एस. पी. एम. लाईफ टाइम हॉस्पीटल रक्तपेढी पडवे येथे दुसऱ्या एका पेशंटला बायपास सर्जरीसाठी ओ पॉझिटिव्ह रक्ताची तातडीने गरज होती. संस्थेचे नियमित ऑन कॉल रक्तदाते तथा ‘युवा विकास प्रतिष्ठान, सांगेली’चे सदस्य सुहास राऊळ, स्वप्नील मेस्त्री, दर्शन राऊळ, दत्ता मेस्त्री यांनी लगेच रक्तदान केले. याव्यतिरिक्त ओटवणे येथील तिसऱ्या पेशंटच्या बायपास सर्जरीसाठी नियमित रक्तदाते चेतन देसाई यांनीही त्याच दिवशी रक्तदान करून मदत केली.
*सावंतवाडी येथे दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटाचा पुरवठा*
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, याच दिवशी संध्याकाळी राणी जानकीबाई रुग्णालय, सावंतवाडी येथे एका भगिनीला ओ निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाच्या रक्ताची अचानक तातडीची गरज भासली. त्यावेळी संस्थेचे नियमित रक्तदाते गिरीश सावंत यांनी कोणतीही वेळ न दवडता रात्री साडेआठ वाजता एस. एस. पी. एम. रक्तपेढीमध्ये जाऊन बहुमोल असे रक्तदान केले आणि या भगिनीला जीवनदान दिले. या तिन्ही पेशंटसाठी रक्तसंकलनाचे वेळी एस. एस. पी. एम. रक्तपेढीचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी मनिषजी यादव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
*खाजगी रुग्णालयातील फ्रॅक्चर पेशंटलाही मदत*
रात्री उशिरा खाजगी हॉस्पिटलमध्ये आलेल्या मातोंडमधील एका फ्रॅक्चर असलेल्या पेशंटसाठी देखील ‘ऑन कॉल रक्तदाते संस्थे’मार्फत एक रक्तदाता व रक्तदाता कार्ड उपलब्ध करून रक्त मिळवून देण्यात आले.
या पाचही पेशंट्सना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे यासाठी ‘ऑन कॉल रक्तदाते संस्थे’चे रक्तदाते पंढरी सावंत, सिद्धेश परब, विनायक वर्णेकर, दशरथ गडेकर, संस्थेचे कार्याध्यक्ष महेश रेमुळकर, सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्दार्थ पराडकर, ‘आभाळमाया ग्रुप’चे गणेश मोरजकर आणि रोहन कदम इत्यादीनी अथक प्रयत्न केले.
‘ऑन कॉल रक्तदाते संस्थे’चे अध्यक्ष मा. दयानंजी गवस सर यांनी एकाच दिवशी पाच पेशंट्ससाठी रक्तदान करून त्यांना जीवनदान देणाऱ्या सर्व १३ रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, रक्ताची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचेही अभिनंदन केले आहे. या १३ रक्तदात्यांच्या एका दिवसातील समर्पणाने गरजू रुग्णांना जीवदान मिळाले असून, रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.











