दापोली प्रतिनिधी:- दापोली शहर विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही सत्तेत सहभागी झालो असून गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोली शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. दापोली नगरपंचायतीच्या करवाढीवरून विरोधक जी टिका आपल्यावर करत आहेत, तो प्रकार म्हणजे साप समजून भुई धोपटण्याचा प्रकार असून आम्ही जनतेच्या विकासासाठी बांधील असून जी करवाढ झालीच नाही त्यावर आरोप कशासाठी असा सवाल दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. कृपा घाग यांनी दापोलीत आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थितीत केला.
उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने दापोली नगरपंचायतीच्या कर वाढीबाबत व अन्य बाबीबाबत नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. कृपा घाग यांनी दापोली नगरपंचायतीच्या दालनामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेठकर, माजी नगरसेवक प्रकाश साळवी, नगरसेविका सौ. प्रिती शिर्के, नगरसेवक विलास शिगवण, उपशहरप्रमुख प्रितम शिंदे, दिपक सुर्यवंशी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा सो. कृपा घाग म्हणाल्या की, दापोली नगरपंचायतीमध्ये गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी लक्ष दिल्यापासून अनेक वर्षे रखडलेला असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला. दापोली एसटी स्टँडचे काँक्रीटीकरण, दापोली पोलिस स्टेशनचे नुतनीकरण, दापोली उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवाढ, दापोली स्टेट बँकेसमोर नवे उद्यान, दापोली हर्णै रस्त्यावर महिला बचत गटांसाठी विक्री केंद्र असे एकनाअनेक विकासकामे करण्यात आली व भविष्यात देखील ती करण्यात येणार आहेत. मात्र विरोधक हे नुसती टिका करायची म्हणून आमच्यावर आरोप करत आहेत.
दापोली नगरपंचायत हद्दीमध्ये सुसज्ज असे रस्ते हे लवकरच होणार आहेत. मात्र सध्या पाऊस पडत असल्याने हे काम थांबले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दापोली शहरातील कचराप्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबध्द असून लवकरच कचऱ्याचे विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. दापोली शहराला पुरेसा पाणी पुरवठा व्हावा यासाठी सोंडेघर धरणातून नळपाणी योजना प्रस्तावित असून प्रशासकीय पातळीवर त्याचा पाठपुरावा गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत. दापोली नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा यासाठी आमचा प्रयत्न असून लवकरच नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळेल असेही यावेळी नगराध्यक्ष सो. कृपा घाग यांनी सांगितले.
विरोधकांचा जो कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत आक्षेप आहे, त्या आक्षेपाबाबत बोलताना नगराध्यक्ष सो.कृपा घाग म्हणाल्या की, दापोली नगरपंचायतीला वर्षाला सुमारे 2 कोटी पेक्षा जास्त निधी हा कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करावा लागतो. त्या तुलनेत नगरपंचायतीला घरपट्टी व अन्य करातून महसूल जमा होत नाही. गेली अनेक वर्षे दापोली नगरपंचायतीचा महसूल हा सुमारे 50 टक्के जमा होत आहे. यामध्ये आपण सुधारणा करणार असून हा महसूल जास्तीत जास्त कसा वाढेल याकडे आपले लक्ष असणार आहे. गेली अनेक वर्षे ज्यांच्याकडे थकबाकी आहे, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दापोली नगरपंचायतीची प्रस्तावित करवाढीबाबत बोलताना नगराध्यक्ष सो. कृपा घाग म्हणाल्या की, विरोधकांचा हा आक्षेप म्हणजे साप समजून भुई धोपटण्याचा प्रकार आहे. दापोली नगरपंचायतीच्या सभागृहासमोर प्रशासनाने करवाढीचा प्रस्ताव ठेवला असून या प्रस्तावावर सभागृहात चर्चा होणे बाकी आहे. शासनाने जे निकष दिले आहेत त्यानुसार ही करवाढ असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. आम्ही जनतेच्या विकासाला बांधील असल्याने या करवाढीवर योग्य तो निर्णय सर्व नगरसेवक घेतील मात्र ही करवाढ करावी लागणार असल्याचे सांगतानाच आपण कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. दापोली नगरपंचायतीमध्ये विरोधकांची सत्ता असताना विरोधकांनी एकही विकासाचे काम केले नाही, दरवेळी त्यांच्यावर पाण्यासाठी महिलांचे मोर्चा येत होते. मात्र आम्ही सत्तेत आल्यावर गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ज्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत, त्याच्यामध्ये सांडपाणी मिसळू नये यासाठी नाला बांधणीचे काम केले आहे. कोकंबाआळी येथे सुमारे 1 कोटी खर्च करून पाईपलाईन बदलली असून खोंडा परिसरात देखील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लवकरच काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दापोली नगरपंचायतीच्या कथित भंगार चोरी व बॅटऱ्या चोरीबाबत बोलताना नगराध्यक्ष सौ. कृपा घाग म्हणाल्या की, आमच्या काळात कोणतेही भंगार चोरीला गेले नाही किंवा बॅटऱ्या चोरीला गेल्या नाहीत. विरोधकांनी हे पसरवलेले गॉसिप असल्याचे सांगतानाच कोणाच्या काळात भंगार चोरीला गेले किंवा बॅटऱ्या चोरीला गेल्या याचा शोध प्रशासनाने घ्यावा यासाठी आपण निर्देश दिले असून लवकरच दुध का दुध, और पाणी का पाणी होणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
दापोली नगरपंचायतीमधील अपहाराबाबत बोलताना नगराध्यक्षा सौ. कृपा घाग म्हणाल्या की, आमचे नेते राज्याचे पर्यावरणमंत्री ना. रामदासभाई कदम, गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम व आम्ही सर्व सत्ताधारी नगरसेवक हे भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत. दापोली नगरपंचायतीमध्ये जो भ्रष्टाचार यापूर्वा झाला आहे त्याची चौकशी शासन स्तरावर सुरू असून आम्ही कोणालाही पाठिशी घालणार नाही असे सांगतानाच दापोली नगरपंचायतीमध्ये पाणी योजनेच्या पंपासाठी जे आवश्यक निकष होते ते डावलून पंप खरेदी झाली आहे. तसेच ट्रॅक्टर खरेदी करताना देखील निकष डावलले गेले असून आपण याचीही चौकशी करणार असून हे कोणाच्या काळात झाले ते विरोधकांनी तपासावे असे प्रतिआव्हानही त्यांनी यावेळी दिले.











