हत्तीच्या भीतीने हेवाळे वीजघर येथे शेती कामाची ‘लगिन घाई’

दोडामार्ग: सुहास देसाई 

 

दोडामार्ग तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या हेवाळे वीजघर परिसरात सध्या शेतकरी वर्गामध्ये भातपीक काढण्यासाठी आणि ते सुरक्षित स्थळी गोळा करण्यासाठी ‘लगिन घाई’ सुरू झाली आहे. या घाईचे कारण आहे जंगली हत्तीचा वाढलेला वावर. असून भीती पोटी आलेले पीक ताब्यात घेण्यासाठी धडपड सुरू झाली आहे

सतत पावसामुळे भातपीक काढायला यंदा उशीर झाला होता. आधीच लांबलेल्या या कामात, आता परिसरात जंगली हत्ती याचा वावर दिसू लागल्याने शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. हत्ती शेतीत येऊन पिकांचे मोठे नुकसान करतात आणि जीवितहानीचा धोकाही असतो. यामुळे, हत्तींचा कळप येण्यापूर्वीच आपले हाताशी आलेले भात पीक वाचवण्यासाठी शेतकरी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.

या भीतीच्या वातावरणामुळे, हेवाळे वीजघर येथील शेतकरी सध्या आपले भात पीक गोळा करताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंता स्पष्टपणे दिसत आहे, पण त्याच वेळी आपल्या कष्टाचे पीक सुरक्षित ठेवण्याची धडपडही दिसत आहे.

हेवाळे वीजघर परिसरात हत्तीची दहशत कायम!!!

 

दोडामार्ग तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या हेवाळे वीजघर येथे हत्तींचा वावर हा नियमित चिंतेचा विषय बनला आहे.

मागील काही वर्षांपासून केर, भेकुर्ली, मोर्ले, वीजघर, हेवाळे, बांबर्डे परिसरात हत्ती सातत्याने धुमाकूळ घालत आहेत.

हत्तींनी यापूर्वीही नारळ, केळी, सुपारी आणि भातशेतीचे मोठे नुकसान केले आहे, ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

वन विभागाने हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वारंवार करत आहेत.