रानडुकरांच्या अवैध शिकारीप्रकरणी नऊ जणांना वनकोठडी

सातारा जिल्ह्यातील कराड वनपरिक्षेत्रात अवैध रानडुकर शिकार प्रकरणात नऊ आरोपींना वनविभागाने अटक करून न्यायालयीन कारवाईत चार दिवसांची वनकोठडी मिळवली आहे.

 

दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे सुमारे 5 वाजता वनपरिक्षेत्र कराडमधील मौजे कासारशिरंबे – बेलवडे रोडवर गस्तीदरम्यान वनअधिकाऱ्यांना गुप्त माहितीच्या आधारे वाहन क्रमांक MH10 DT 6696 ची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गाडीत सात जिवंत रानडुक्कर, शिकारीसाठी वापरण्यात येणारे वाघर, गॅसचे साहित्य तसेच तीन पाळीव शिकारी कुत्री आढळून आली.

 

या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे सोमनाथ बबन आडके, अमोल मारुती माने, सचिन हणमंत क्षिरसागर, सागर तानाजी यलमारे (सर्व रा. कासारशिरंबे, ता. कराड), गणेश नामदेव नंदीवाले (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ), योगेश रघुनाथ कुंभार (रा. मानकापूर, ता. चिकोडी), अमोल गुंडाजी नंदीवाले (रा. कोथळे, ता. शिरोळ), अमित संजय आडके (रा. कासारशिरंबे) आणि दत्तात्रय धोंडीराम ढोणे (रा. पलूस, ता. पलूस) अशी आहेत.

 

चौकशीत आरोपींनी कबुल केले की ही सात जिवंत रानडुक्करे त्यांनी मौजे राजेगाव व गव्हाणधडी (ता. माजलगाव, जि. बीड) येथून आणली होती. त्यानंतर वनविभागाने मुद्देमालासह सर्व आरोपींना अटक केली.

 

दि. 11 नोव्हेंबर रोजी प्रथम न्यायदंडाधिकारी यांनी सर्व आरोपींना चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कलम 9, 39, 50 व 51 लागू करण्यात आले असून हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 1 लाख रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

 

वनपरिक्षेत्र कराड येथील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, वन्यप्राण्यांची शिकार, अवैध वाहतूक, वृक्षतोड, राखीव वनक्षेत्रातील अतिक्रमण किंवा वनक्षेत्रात आग लावणे हे गंभीर गुन्हे आहेत. अशा घटना घडल्यास वनविभागाकडून कठोर कारवाई करण्यात येईल.

 

ही कारवाई उपवनसंरक्षक श्री. अमोल सातपुते (भा.व.से.), सातारा वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सहायक वनसंरक्षक श्रीमती जयश्री जाधव (वनी व कॅम्पा), वनक्षेत्रपाल (प्रा.) श्रीमती ललिता पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल दिलीप कांबळे (कोळे), आनंद जगताप (मलकापूर), वनरक्षक दशरथ चिट्टे (कासारशिरंबे), अभिनंदन सावंत (कोळे), कविता रासवे (तांबवे) तसेच कराड वनपरिक्षेत्रातील सर्व वनकर्मचारी सहभागी होते.

 

रेस्क्यू टीममधील अजय महाडीक आणि रोहित कुलकर्णी यांनीही कारवाईत मदत केली. पुढील तपास वनक्षेत्रपाल (प्रा.) श्रीमती ललिता पाटील करीत आहेत.