राजापुरातील त्या घटनेचे वाढले गूढ; पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक आवळली
राजापूर | प्रतिनिधी
राजापूर शहरानजीकच्या कोदवली पुनर्वसन वसाहतीतील हॉटेल फुडलैंड येथून नोंदणी रजिस्टर घेवून पोबारा करणाऱ्या त्या चार संशयित आरोपींनी वापरलेली गाडी संगमेश्वर, तुरळे येथे सावर्डा पोलिसांनी जप्त केली आहे. या गाडीमध्ये पाच मोबाईल व वेगवेगळ्या हॉटेलची ग्राहक नोंदणीची पाच ते सहा रजिस्टर आढळून आली आहेत. संगमेश्वर पोलिसांनी नाकाबंदी केल्यानंतर या संशयित आरोपींनी गाडी सोडून पलायन केले आहे. दरम्यान राजापूर व संगमेश्वर पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. या संशयित आरोपींनी राजापूरातील हॉटेल फुडलैंड येथून रोख सहा हजार रूपये लांबविल्याचे तर संगमेश्वर येथील एका हॉटेलमधून साडेपाच हजार रूपये लांबविल्याचे पुढे आले असून या हॉटेल मालकांच्या तक्रारीवरून राजापूर व संगमेश्वर पोलिसांनी या चारही संशयित आरोपींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे, तशी माहिती राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.

सोमवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान राजापुरातील हॉटेल फुडलैंड येथे रूम बघण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये येवून हॉटेलचे ग्राहक नोंदणी रजिस्टर घेवून या चारही संशयितांनी पोबारा केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. दरम्यान संगमेश्वर येथे देखील या चारही आरोपींनी एका हॉटेलमधून अशाच प्रकारे ग्राहक नोंदणी रजिस्टर लांबवत पळ काढला होता. ही बाब हॉटेल मालकाच्या लक्षात येताच त्याने संगमेश्वर पोलीसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. संगमेश्वर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी तत्काळ नाकाबंदी केली.

दरम्यान पोलिसांची सर्वत्र नाकाबंदी असल्याचे लक्षात येताच या संशयितांनी वापरलेली गाडी हुंडाई गाडी क्र. के.ओ. ५१ एम.जी. ६९०५, रंग निळा ही महामार्गावर तुरळ येथे सोडून पळ काढला. सावर्डा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांनी तत्काळ ही गाडी ताब्यात घेतली. या गाडीत पाच मोबाईल व पाच ते सहा हॉटेल ग्राहक नोंदीची रजिस्टर आढळून आली आहेत. यामध्ये आंबोली, सावंतवाडी, कणकवली व संगमेश्वर येथील रजिस्टरचा समावेश आहे. तर राजापूर येथील फुडलैंड हॉटेलचे रजिस्टर याच परिसरात महामार्गावर फेकून दिले होते. ते देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेनंतर राजापूर पोलिसांनी तत्काळ संगमेश्वर व सावर्डा पोलिसांशी संपर्क साधला असून सदर गाडी व त्यातील सापडलेले साहित्य ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. या आरोपींचाही पोलीस शोध घेत असून ते देखील लवकरच जेरबंद होतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या आरोपींनी वापरलेली ही गाडी कर्नाटक राज्यातील देवनगर, यल्लापूरा, मदापूरा, हारवान हल्ली, तालुका देवंगडी येथील असून यावर असलेल्या मोबाईलवर पोलीसांनी संपर्क साधला असता सदरचा फोन लागत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदरच्या आरोपींचा अशाप्रकारे हॉटेलमध्ये घसून चोरी करण्याचा आणि हॉटेलची नोंदणी रजिस्टर लांबविण्याचा गंभीर हेतू असून या प्रकरणी राजापूर व संगमेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत.












