वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अनेक जण इच्छुक

पण तिसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी आहे. मात्र आज अर्ज भरण्याचे तीन दिवस उलटले तरी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र ते कधी उमेदवारी अर्ज दाखल करणार हे पुढील पाच दिवसात स्पष्ट होणार आहे.

वेंगुर्ले नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी हेमंत किरुळकर हे काम पाहत आहेत. उमेदवार अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून त्यानंतर उमेदवारी अर्ज भरल्याची प्रिंट तसेच अन्य कागदपत्रे संबंधित उमेदवाराने येथील नगर परिषदेमधील निवडणूक कक्षाकडे सादर करायचे आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने नगरपरिषद परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. १७ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे उर्वरित पाच दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे.