विजयदुर्ग येथील जलतरण स्पर्धेत ३० किमी अंतरासाठीच्या पुरुष गटात रुद्र सौरभ मनाडे, कोल्हापूर प्रथम तर महिला गटात आरोही व्यवहारे, ठाणे प्रथम 

देशभरातून ५१ जलतरणपटू सहभागी

   विजयदुर्ग (प्रतिनिधी ) : विजयदुर्ग मध्ये झालेल्या जलतरण स्पर्धेत ३0 किलोमीटर अंतरासाठीच्या पुरुष गटात रुद्र सौरभ मनाडे कोल्हापूर तर महिला गटात आरोही व्यवहारे, ठाणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. दरम्यान १५ किलोमीटर अंतरासाठीच्या पुरुष गटात स्मरण सुजित मंगलोरकर, बेळगाव तर महिला गटातून आयुषी कैलाश आखाडे, ठाणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचे हे पाचवे वर्षे होते.

श्री दुर्गामाता कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ- विजयदुर्ग व जिम स्विमिंग अकॅडमी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र राज्य संघटनेच्या मान्यतेने संघटनेचे अध्यक्ष आनंद माने व सचिव राजेंद्र पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी वाघोटण खाडीत राज्यस्तरीय मॅरेथॉन व अर्ध मॅरेथॉन जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देशभरातून ५१ जलतरणपटू सहभागी झाले होते. वाघोटण खाडीतील ३० कि. मी. अंतरासाठीच्या पुरुष गटात रुद्र सौरभ मनाडे (कोल्हापूर), तर महिला गटात आरोही व्यवहारे (ठाणे) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच १५ कि. मी. अंतरासाठीच्या पुरुष गटात स्मरण सुजित मंगलोरकर (बेळगाव), तर महिला गटातून आयुषी कैलास आखाडे (ठाणे) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेचे उद्घाटन मालपे येथे करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी जि. प. च्या माजी सदस्या मनस्वी घारे, न. पं. च्या महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती रुचाली पाटकर, नगरसेविका सौ. तन्वी चांदोस्कर, प्राजक्ता घाडी, विजयदुर्गचे पोलीस निरीक्षक संजय कातिवले, श्री दुर्गामाता कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या सचिव सौ. संजना आळवे, खजिनदार रविकांत राणे, जिम स्विमिंग अकॅडमीचे अजय पाठक, प्रसाद देवधर, स्पर्धा निरीक्षक कैलाश आखाडे (ठाणे), नीलकंठ आखाडे (रायगड) आदी मान्यवर उपस्थित होते. वाघोटण खाडीत मालपे ते विजयदुर्ग असे ३० कि. मी. चे अंतर तर मालपे ते वाघोटण असे १५ कि. मी. च्या अंतरावर राज्यस्तरीय मॅरेथॉन व अर्ध मॅरेथॉन जलतरण स्पर्धा घेण्यात आली. खाडीतील लांब अंतराची ही भारतातील एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

या स्पर्धेत ३० कि. मी. च्या अंतरासाठीच्या पुरुष गटात द्वितीय क्रमांक विराज विजय पुरोहित (ठाणे), तृतीय क्रमांक तृणांश नंदन गंद्रे (ठाणे), चतुर्थ क्रमांक आरित जिंदाल (ठाणे) पाचवा क्रमांक रुद्र विकास निसार (ठाणे) यांनी मिळविला. तर महिला गटात द्वितीय क्रमांक चैत्राली मुकुंद नवले (सातारा), तृतीय क्रमांक सारा अभिजीत वर्तक (रायगड) यांनी यश मिळविले. स्पर्धेतील १५ कि. मी. अंतरासाठीच्या पुरुष गटात द्वितीय क्रमांक हृदय गुप्ता (ठाणे), तृतीय क्रमांक अनमोल महेश दिवडकर (ठाणे), चतुर्थ क्रमांक दिविथ कौन्डेनिया (संभाजीनगर), पाचवा क्रमांक आदी समित गोसर (मुंबई) यांनी यश मिळविले. तर महिला गटात द्वितीय क्रमांक अनन्या पवन पत्की (कोल्हापूर), तृतीय क्रमांक पूर्विका मिकी पाटील (ठाणे), चतुर्थ क्रमांक महेक टन्ना (ठाणे), पाचवा क्रमांक स्वरा महेश पाटील (रायगड) यांनी यश मिळविले. स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक जलतरणपटूला एक बोट, स्पीड बोट आणि डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस, मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तर स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना फिनिशिंग मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विजयदुर्ग जेटी येथे पार पडलेल्या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी माजी सभापती रवी पाळेकर, भाजपचे पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, उदय पाटील, माजी उपसरपंच महेश बिडये, चंद्रकांत बिडये, वाघोटण उपसरपंच प्रकाश तिर्लोटकर, शरद डोंगरे, कैलाश आखाडे, निळकंठ आखाडे, विश्वेष दूधम, निरजसिंग, शैलेश सिंग, ॲड. प्रवीण भंडारी (कोल्हापूर), दीपक करंजे, सिद्धेश डोंगरे, युसुफ मुजावर, बाबू डोंगरे आदी उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी अजय पाठक, रवी पाळेकर, संजना आळवे, रविकांत राणे, प्रसाद देवधर, शरद डोंगरे, सादिक डोंगरकर, तौसिफ शिकलगार, `जेनीसिस ॲड`चे राजू परुळेकर, राकेश तेली, श्री. रहाटे, सौ. संजना वानिवडेकर, विजयदुर्ग बोट क्लब आदींनी विशेष मेहनत घेतली. या स्पर्धेला रसिकांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला.