गोवळकोट रोड परिसरातील धक्कादायक प्रकार
चिपळूण : शहरातील गोवळकोट रोड येथील लतिफा अपार्टमेंट येथे एका तरुणाने वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा धक्कादायक प्रकार २८ जून ते १३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडला आहे. यामध्ये महावितरण कंपनीचे १० हजार १७० रुपयाचे आर्थिक नुकसान झाले असून याप्रकरणी शनिवारी चिपळूण पोलीस स्थानकात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशफाक-ए-गफर मेमन (४०, गोवळकोट रोड-लतिफा अपार्टमेंट) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता नितीन शंकर कांबळे (५१, पाग-चिपळूण) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशफाक मेमन याने वीज मीटरच्या मागील बाजूस ड्रीलच्या सहाय्याने छीद्र पाडून तांब्याच्या वायरचा तुकडा लूप करुन तो मीटरच्या आतमध्ये टाकला होता. त्यामुळे वीज मीटर संथ गतीने वीज मोजणी करीत असल्याचे महावितरण कर्मचाऱ्यांचे निदर्शनास आले. त्यानुसार अशफाक मेमन याने लबाडीने दि. २८ जून पासून दि. १३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत एकूण ९५१ युनिटची चोरी केल्याने यात महावितरण कंपनीचे १० हाजर १७० रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. हा वीज चोरीचा प्रकार महावितरण सहाय्यक अभियंता नितीन कांबळे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेमन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










