दोडामार्ग l प्रतिनिधी – तळकट गावचे सुपुत्र, सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि फळबागायतदार संघाचे अध्यक्ष मा. श्री. विजयकुमार भिकाजी मराठे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय आणि शेतकरी क्षेत्रातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व हरपले असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुका भाजपा पक्षाचे मार्गदर्शक हरपला आहे अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे
प्रभावी नेतृत्व आणि कर्तृत्व
विजयकुमार मराठे हे आपल्या स्वाभिमानी व्यक्तिमत्त्वासाठी आणि प्रभावी वकृत्वशैलीसाठी ओळखले जात होते. कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठावरून ते प्रत्येक विषयावर आपले ठाम मत प्रभावीपणे मांडत असत. त्यामुळे त्याचा दबदबा पक्षाचे नेते म्हणून होता
श्री विजयकुमार मराठे यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून संघटनेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात पक्षाला जिल्ह्यात बळकट करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्या काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्याचे भरीव योगदान होते
शेतकरी क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असून ते फळबागायतदार संघाचे अध्यक्ष होते. या भूमिकेतून त्यांनी जिल्ह्यातील शेतकरी आणि फळबागायतदारांच्या समस्या पोटतिडकीने मांडल्या आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी नेहमीच संघर्ष केला.
राजकीय आणि शेती क्षेत्रातील व्यस्ततेसोबतच ते सामाजिक कार्यात नेहमीच अग्रस्थानी राहिलेले एक अत्यंत क्रियाशील व्यक्तिमत्त्व होते.
श्री.विजयकुमार मराठे यांच्या अकाली निधनाने जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय आणि शेतकरी या तीनही प्रमुख क्षेत्रांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्याने मराठे कुटुंब आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्याचा दुःख निधनाची बातमी समजताच विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपा पदाधिकारी यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती .












