जेसीआय खेडला दुहेरी बहुमान : जेएफडी अमर दळवी ‘झोनचा सर्वोत्कृष्ट अध्यक्ष’, खेडला ‘उत्कृष्ट लोम २०२५’ पुरस्कार

खेड :  जेसीआय इंडिया झोन ११ आयोजित विभागीय परिषदेमध्ये जेसीआय खेडने २०२५ या वर्षात उल्लेखनीय कामगिरी नोंदवत बहुमानाची कमाई केली. या परिषदेत जेसीआय खेडचे अध्यक्ष जेएफडी अमर दळवी यांना झोनचा सर्वोत्कृष्ट अध्यक्ष हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर जेसीआय खेडला उत्कृष्ट लोम २०२५ हा प्रतिष्ठेचा किताब जाहीर झाला.
या वर्षभरात जेसीआय खेडच्या अधिकारी व सदस्यांनी विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करत झोनमध्ये भक्कम वर्चस्व निर्माण केले. उत्कृष्ट सेक्रेटरी म्हणून जेसी कपिल कोळेकर, उत्कृष्ट LO ऑफिसर म्हणून जेसी हेमंत चिखले, उत्कृष्ट जेसी मेंबर ऑफ झोन म्हणून जेएफएम मधुर पेठे, तर उत्कृष्ट न्यू जेसी मेंबर ऑफ झोन म्हणून जेएफडी डॉ. दिग्विजय पवार यांनी कामगिरीची नोंद केली. विविध विभागांमध्ये एकूण १२ पुरस्कारांची कमान करत जेसीआय खेडने परिषदेत चमकदार यश मिळवले. सर्व पुरस्कार झोन अध्यक्ष जेएफडी शाबा गावस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या भव्य सोहळ्यास गोवा राज्याचे मुख्यमंत्री जेसी डॉ. प्रमोद सावंत, जेसीआय इंडिया माजी राष्ट्रीय अध्यक्ष जेएफएस रीकेश शर्मा, झोन ११ चे माजी अध्यक्ष अतुल गोंधकर, अमोल क्षिरसागर, इशान उसापकर तसेच माजी नॅशनल उपाध्यक्ष सचिन कुर्तीकर आणि सचिन देसाई यांसह विविध लोम अध्यक्ष, झोन गव्हर्निंग बोर्ड सदस्य आणि मोठ्या संख्येने जेसीआय परिवार उपस्थित होता. या कार्यक्रमानंतर अध्यक्ष जेएफडी अमर दळवी यांनी सांगितले की, जेसीआय खेडला मिळालेले हे यश संघभावना, सातत्यपूर्ण परिश्रम आणि सदस्यांच्या निष्ठावान योगदानामुळे शक्य झाले आहे. भविष्यातही विकास आणि सामाजिक उपक्रमांसाठी हीच उर्जा आणि जोम कायम ठेवत संस्था आणखी प्रभावीपणे कार्यरत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.