सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्ष पदासाठी ६ अर्ज वैध 

तर नगरसेवक पदासाठी ९४ अर्ज वैध : २ डिसेंबरला होणार मतदान

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगर परिषदेच्या बहुप्रतिक्षित सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज मंगळवारी छाननी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील आणि मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी अर्जाची छाननी केली. यावेळी सर्व पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तसेच काही अपक्षांकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकूण ११ अर्ज, तर नगरसेवक पदासाठी एकूण ११४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज सकाळी ११ वाजता या अर्जांची छाननी प्रत्येक वॉर्डाप्रमाणे करण्यात आली.

छाननी प्रक्रियेत नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या ११ अर्जांपैकी ६ अर्ज वैध ठरले. यामध्ये उबाठा गटाच्या सीमा मठकर, भाजपाकडून श्रद्धा सावंत भोसले, अन्नपूर्णा कोरगावकर अपक्ष, निशाद बुराण अपक्ष, शिवसेनेकडून ॲड. निता कविटकर आणि काँग्रेसकडून साक्षी वंजारी यांचे अर्ज वैध ठरले आहेत.

तर नगरसेवक पदासाठी प्राप्त झालेल्या ११४ उमेदवारी अर्जांपैकी २० उमेदवारी अर्ज अवैध ठरले. त्यामुळे नगरसेवकाच्या २० जागांसाठी एकूण ९४ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जामध्ये काही अपक्ष उमेदवारांचीही नावे समाविष्ट आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २१ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत नेमके किती जण उमेदवारी अर्ज मागे घेतात, यावरून प्रत्येक प्रभागातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. अपक्ष उमेदवारी दाखल केलेले उमेदवार आपला अर्ज मागे घेतात की कायम ठेवतात, हेसुद्धा २१ तारखेनंतर स्पष्ट होईल.

एकूण १० प्रभागांमध्ये ही निवडणूक होत आहे. प्रामुख्याने शिवसेना आणि भाजप अशी लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून १६ जागांवर आपले उमेदवार उतरविण्यात आले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वतीने ५ जागांवर उमेदवार नशीब आजमावत आहेत. सर्वच प्रभागांमध्ये यावेळी तुल्यबळ लढत होणार आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात खरी लढत अपेक्षित आहे, तर उबाठा शिवसेनेनेही काही जागांवर चांगले उमेदवार दिल्याने त्या ठिकाणीही रस्सीखेच पाहायला मिळेल. काही नाराज कार्यकर्त्यांकडून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांची नाराजी दूर करण्याची कसरत त्या त्या प्रभागातील उमेदवारांना करावी लागणार आहे. एकूणच २१ तारखेनंतर नगरपरिषदेच्या या निवडणुकीत अधिकाधिक रंगात वाढणार आहे.

नगराध्यक्ष पदासाठी यावेळी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. शहरातील एकूण मतदार लक्षात घेता नगराध्यक्ष पदाच्या सहा उमेदवारांमध्ये मतांची विभागणी होणार आहे. मतांच्या विभागणीमध्ये नेमका कोण बाजी मारतो हे ३ डिसेंबरला मतमोजणीच्या दिवशी दिसणार आहे. सावंतवाडी नगर परिषदेची सर्वत्रिक निवडणूक येत्या २ डिसेंबरला होऊ घातली आहे.