आला थंडीचा महिना झटपट शिकोटी पेटवा…..

 थंडीच्या प्रमाणात झाली वाढ; पारा घसरला; जिल्ह्यात ‘हुडहुडी’ वाढली!

चिपळूण  : “आला थंडीचा महिना झटपट शिकोटी पेटवा.. मला लागलंय खोकला..” या स्व. दादा कोंडके यांच्या चित्रपटातील गीताची आठवण येते. कारण गेल्या आठवड्यापासून थंडीचे प्रमाण वाढले असून शहर आणि ग्रामीण भागात सुद्धा गारवा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे शेकोटी पेटू लागल्या असून शेकोटी जवळ सामूहिक गप्पा सुद्धा रंगू लागल्या आहेत. ग्रामीण भागात आठवडाभरापासून जिल्ह्यात हिवाळ्याची चाहूल लागली होती; मात्र मागील दोन दिवसांत गारवा वाढला आहे. शनिवारपासून पारा खाली आल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात थंडीचे प्रमाण जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.
यावर्षी पाऊस जास्त पडल्याने थंडीही जास्त पडणार असे बोलले जात आहे. नोव्हेंबरच्या प्रारंभी थंडीचा मागमूसही नव्हता; पण अचानक वातावरणातील बदलामुळे जिल्हा गारठून गेला आहे. कार्तिकी पौर्णिमेनंतर गुलाबी थंडीने अचानक वेग घेतला आणि काहीच दिवसांत कडाक्याच्या थंडीनं नागरिकांना घराबाहेर पडताना हुडहुडी भरू लागली आहे. हवामान खात्याने नोंदविल्याप्रमाणे, गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात घट दिसून आली असून, त्यामुळे थंडीच्या कडाक्यात भर पडली आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोग्यावर सुद्धा परिमाण होत आहे. सर्दी, खोकला आणि तापाच्या तक्रारी वाढल्याने शहर व ग्रामीण भागातील दवाखान्यांमध्ये रुग्ण दिसून येत आहेत. हवामानातील बदल शरीराला पचनी न पडल्याने विशेषतः मुलांमध्ये व ज्येष्ठांमध्ये त्रास अधिक जाणवत आहे.
थंडीमुळे पहाटेच्या शाळेला जाणाऱ्या चिमुकल्यांना तसेच त्यांना सोडण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना आता उबदार स्वेटर शिवाय पर्याय उरला नाही. थंडीची लाट वाढताच अनेक ठिकाणी शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे. एकत्र येऊन शेकोटीभोवती बसून गारठा दूर’ करत आहेत. यासोबतच गरम चहा, कॉफी, मागणी वाढली आहे. दुकाने सूप यांना नागरिकांकडून मोठी आणि टपऱ्यांवर रात्री उशिरापर्यंत नागरिक चहाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. अजून थंडीचे प्रमाण वाढणार हवामान विभागाच्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या उत्तरार्धात जिल्ह्यात आणखी कडाक्याची थंडी जाणवू शकते. तापमानात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे तसेच गरम कपड्यांचा वापर वाढवण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.