राजघराण्याने शहराच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची परतफेड करण्याची वेळ
आ. केसरकरांसह सर्वच पक्षांनी श्रद्धाताईंना बिनशर्त पाठिंबा देण्याची गरज
श्रद्धाताईंनी सावंतवाडीची संस्कृती व भाषा स्वीकारली यातच त्यांचे कौतुक
निवडणुका दोन दिवसांच्या : महिला भगिनींचा अपमान सहन करणार नाही
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील संस्थानाकालीन राजघराण्याने सावंतवाडी शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. येथील लोकप्रतिनिधींना या घराण्याचे नेहमीच आशीर्वाद लाभले आहेत. त्यानंतर आज प्रथमच शहराच्या विकासासाठी या घराण्याने नगरपरिषदेच्या निवडणुकीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळेच भारतीय जनता पार्टींने त्यांना उमेदवारी दिली असून खरे तर राज घरण्याची अस्मिता म्हणून सर्वच पक्षांनी त्यांना बिनशर्त पाठिंबा देऊन त्यांच्या ऋणातील उतराई होण्याची ही वेळ आहे. आज केंद्रापासून जिल्ह्यापर्यंत आमची सत्ता आहे त्यामुळे सावंतवाडी राजघराण्याचा इतिहास व त्याला सत्तेची जोड याद्वारे या सुंदर शहराचा विकास साधत पर्यटनाच्या माध्यमातून सावंतवाडी शहराला विकासाचे ‘रोल मॉडेल’ बनवू असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. श्रद्धा भोंसले आणि नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ राजवाडा येथील श्री देव पाटेकर देवस्थानला श्रीफळ अर्पण करून
करण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा परिषदच्या माजी सभापती शर्वाणी गावकर, भाजपा कायदा सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे, शेखर गांवकर, माजी नगरसेवक उदय नाईक, दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, मधुकर देसाई, अमित परब, ॲड. संजू शिरोडकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सावंतवाडीला ओळख देणारे हे राजघराणं आहे. संस्थानकालीन सावंतवाडी शहरात आरोग्य, पाणी पुरवठा तसेच इतर सर्व सुविधा पुरविण्याचे काम राजघराण्याने केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातही राजघराण्याचे मोठे योगदान राहिले आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या राजकीय वाटचालीत राजघराण्याने नेहमीच आशीर्वाद व पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आमदार केसरकर यांचे राज घराण्याशी असलेले संबंध पाहता व राज घराण्याने त्यांना नेहमीच दिलेला पाठिंबा व सहकार्य पाहता राजघराण्यातील उमेदवार म्हणून श्रद्धा भोसले यांना ते पाठिंबा देतील अशी अपेक्षा होती. खरंतर राजघराण्याचं या शहरासाठी असलेले योगदान पाहता सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना बिनशर्त पाठिंबा देणे अपेक्षित असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
खर तर ही निवडणूक आपल्यासाठी एक स्वाभिमानाची व अस्मितेची बाब आहे. त्यामुळे ही निवडणूक जनतेने हातात घेण्याची गरज आहे. ज्या प्रमाणे खा. नारायण राणे लोकसभा निवडणूकीला उभे होते त्यावेळी जिल्ह्यातील विशेषतः सावंतवाडी मतदारसंघातील मतदारांनी आपलं पहिलं मत देण्याची संधी म्हणून त्यांना मत दिलं होतं तसच मत श्रद्धाताई यांना देऊन राजघराण्याच्या योगदानातून उतराई होण्याची ही मतदारांना संधी असल्याचेही त्यांनी यावेळेस स्पष्ट केले.
केंद्रात व राज्यात आमची सत्ता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे यांची साथ आम्हाला आहे. मी स्वतः पालकमंत्री ‘ आहे. त्यामुळे निधीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा अर्थात आमच्या विचारांचे नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आल्यास विकास करणे अधिक सोपे जाईल. श्रद्धा भोसले या उच्चशिक्षित आहेत. राजघराण्याचा समाजसेवेचा वारसा त्या पुढे नेत आहेत. त्यामुळे सावंतवाडीकर नागरिकांनी त्यांना संधी दिल्यास शहराचा सर्वांगीण विकास करणे ही आमची जबाबदारी राहील. या ऐतिहासिक शहराचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करायचा आहे त्यामुळे त्यामुळे सावंतवाडीकरांनी पाच वर्षांसाठी संधी द्यावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
युती बाबतची भूमिका ही वरिष्ठ पातळीवर होत असते. त्यामुळे
आम्हाला वरिष्ठांकडून जो आदेश किंवा सूचना मिळतात तसे काम आम्ही करीत असतो.
दरम्यान, आम्हाला कोणावरही टीका करायची नाही कोणी कितीही आरोप केले तरीही आम्ही उत्तर देणार नाही केवळ विकासावर बोलणार. भाजपात मी असं नसतं, आम्ही असतं. त्यामुळे ही आमची सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही सर्वजण मिळून जनतेसमोर जाणार शेवटी जनतेने ठरवायचं आहे कोणाला सत्ता द्यावी व जनता विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला निश्चितच साथ देईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सावंतवाडीत कंटेनर थिएटर देण्याचा आम्ही निश्चितच शब्द दिला होता. त्यावेळी मी आमदार होतो. त्यासाठी काय अडचणी आल्या ते सांगत बसण्याची ही वेळ नव्हे. मला पुढील पाच वर्षात काय करायचं आहे त्याची आठवण करून दिल्या बद्दल आभारी असे सांगतानाच केवळ कंटेनर थिएटरचं काय खूप विकास करायचा आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
*श्रद्धाताईंनी लग्नानंतर येथील संस्कृती व भाषा स्वीकारली याचे कौतुकच*
श्रद्धाताई भोसले यांच्या मराठी बोलण्यावरून त्यांना काही जणांकडून ट्रोल केले जात आहे. लग्न होऊन सावंतवाडीत आल्यानंतर त्यांनी इथली संस्कृती स्वीकारली व भाषा ही स्वीकारली. आपल्या जिल्ह्यात त्या आल्या व आपली संस्कृती त्यांनी स्वीकारली त्याचं कौतुकच आहे. त्या उच्चशिक्षित आहेत. सामाजिक वारसा व विकासाचा त्यांना ध्यास आहे. त्यामुळे त्यांना सत्तेची जोड मिळाल्यास त्या निश्चितच सावंतवाडीचा विकास करून दाखवतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
*कणकवलीची गोष्ट नवीन नाही*
कणकवलीतील शहर विकास आघाडी हा प्रयोग काही नवीन नाही. यापूर्वीही राणेंना घेण्यासाठी असे खूप प्रयोग झाले आहेत. या निवडणुकीत तर जे कोणाला जमलं नाही ते राणे साहेबांच्या कणकवलीने करून दाखवलं आहे.
ठाकरे व शिंदेंना एकत्र आणण्याचं काम कणकवलीकरांनी केले आहे. मात्र, माझं नाव नितेश ‘नारायण’ राणे असून असे चक्रव्यूह भेदण्यात माझी पीएचडी आहे, असा टोला त्यांनी लगावला.
*महिला भगिनीची बदनामी सहन करणार नाही*
श्रद्धा भोसले या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवीत आहेत. आम्ही पक्ष म्हणून देखील विकासाच्या मुद्द्यावरच जनतेपर्यंत जात आहोत. अशावेळी काही जणांकडून चुकीच्या पद्धतीने अपप्रचार तसेच सोशल मीडियावर बदनामी केली जात आहे. याबाबत आमदार केसरकर यांनी आपल्या नेत्यांना समज द्यावी. निवडणूक दोन दिवसांची आहे मात्र महिला भगिनीची बदनामी आम्ही सहन करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
*सावंतवाडीकर असल्याचा अभिमान: श्रद्धाराजे भोंसले*
सावंतवाडीकर असल्याचा मला अभिमान आहे. राजकारणात फक्त सावंतवाडीची सेवा करण्यासाठी मी उतरले आहे. भारतीय जनता पार्टीने मला आशीर्वाद दिला असून मला सावंतवाडीकर नागरिकांचा आशीर्वाद हवा आहे त्यांनी मला एक संधी द्यावी त्यांना अपेक्षित असं काम करून दाखवीन, असा विश्वास भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केला.













