महायुती व महाविकास आघाडीत काटे की टक्कर
राजापूर (प्रतिनिधी): राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी महायुतीच्या श्रृती ताम्हनकर, महाविकास आघाडीच्या एड. हुस्नबानू खलिफे व अपक्ष म्हणून हिंदू महासभेच्या ज्योती खटावकर यांच्यात ही तिरंगी लढत होणार आहे. यासाठी तीन उमेदवार जरी निवडणूकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत ही महायुतीच्या श्रृती ताम्हनकर, विरूध्द महाविकास आघाडीच्या हुस्नबानू खलिफे यांच्यातच होणार आहे. राजापुरात महायुतीचे नेतृत्व शिवसेना आमदार किरण सामंत करत असून महाविकास आघाडीचे नेतृत्व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या माजी आमदार एड. हुस्नबानू खलिफे व शिवसेना उबाठा चे माजी आमदार गणपत कदम करत आहेत. त्यामुळे या नगर परिषदेच्या निवडणूकीत या आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या तरी राजापुरात महायुती व महाविकास आघाडी यांच्यात काटे की टक्कर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नगर परिषद अस्तीत्वात आल्यानंतर पाचव्यांदा होणाऱ्या या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळयात पडणार आणि राजापूकर कोणाला कौल देणार याची उत्सुकता राजकिय निरीक्षकांसह शहरवासीयांना लागून राहिली आहे.
राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता या ठिकाणी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी तीन तर दहा प्रभागांतील वीस नगरसेवक पदांसाठी ५१ असे एकूण ५४ उमेदवार राजापुरात या निवडणूकीच्या रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदाची तिरंगी लढत होणार असून दहा प्रभागांतील एकूण वीस जागांमध्ये अकरा जागी तिरंगी तर नऊ जागी दुरंगी लढत होत आहे.
यापुर्वी पहिली लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची निवडणूक सन १९७४ मध्ये झाली होती. त्यावेळी कै. गजानन कुशे हे जनतेतुन निवडून आलेले राजापूरचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ हा १७ डिसेंबर १९७४ ते २७ डिसेंबर १९८० असा होता. त्यानंतर पुन्हा सन २००१ मध्ये झालेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी अखंड शिवसेनेच्या एड. सौ. हुस्नबानू खलिफे या निवडून आल्या होत्या. १७ डिसेंबर २००१ ते १६ डिसेंबर २००६ या कालावधीत त्यांनी या पदावर काम केले. तर त्यानंतर सन २०१६ मध्ये झालेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाकडून हनिफ मुसा काझी हे विजयी झाले होते. मात्र जातवैधता प्रमाणापत्र अवैध ठरल्याने काझी यांना राजीनामा द्यावा लागला होता. २३ डिसेंबर २०१६ ते २६ फेब्रुवार २०१८ या कालावधीत त्यांनी या पदावर काम केले. त्यानंतर या पदासाठी जुलै २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणूकीत काँग्रेसचे एड. जमिर खलिफे यांनी बाजी मारली होती व १६ जुलै २०१८ ते २२ डसेंबर २०२१ असा त्यांचा कार्यकाळ राहिला होता. त्यानंतर प्रशासकिय राजवट जारी होती.
आता या नगराध्यक्ष पदासह नव्याने प्रभाग रचना झालेल्या दहा प्रभागांतील वीस नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या असलेल्या व राजापूर महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष असलेल्या श्रृती ताम्हनकर यांना शिवसेना पक्षाने शिवसेनेत प्रवेश करून घेत शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी दिली आहे. एक शांत, संयमी आणि महिला वर्गासाठी झपाटून काम करणाऱ्या म्हणून ताम्हनकर यांची ओळख आहे. गेली कित्येक वर्षे त्या राजकारण व समाजकारणात सक्रिय आहेत. भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या असलेल्या ताम्हनकर यांनी पक्षात विविध पदावर काम केले आहे. त्यांनी भाजपाच्या तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली होती. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातही त्यांचा चांगला संपर्क आहे. तर महिला पतसंस्थेच्या माध्यमातुनही त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी करत महिलांचे एकत्रिकरण करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. आता शिवसेनेकडून त्यांना या पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेना आमदार किरण सामंत हे या निवडणूकीची धुरा सांभाळत असून त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे या निवडणूकीत आपल्या उमेदवारांसाठी परिश्रम घेत आहेत. आ. किरण सामंत यांनी शहर विकासाचा एक आराखडा तयार करून शहराचा विकास करण्याचे ध्येय निश्चित केले असुन त्यासाठी राजापुरकरांनी महायुतीला साथ द्यावी अशी साद त्यांनी घातली आहे. रस्ते, विज, पाणी याबरोबरच शहाराला एक नवा विकासाचा आयम देण्याचा त्यांचा संकल्प आहे.
नगराध्यक्षदाच्या या निवडणूकीत भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या शीतल पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र त्यांनी आपला प्रभाग क्रमांक चार मधील अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला असून अन्य काही प्रभागात भाजपाचे कार्यकर्ते असलेले काही उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे याचा महायुतीला फटका बसतो का हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र या निवडणूकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी एक फ्रेश चेहरा म्हणून सौ. ताम्हनकर यांना महायुतीकडून पुढे आणण्यात आले असून राजापूरकर काय कौल देतात याबाबत साऱ्यानांच उत्सुकता आहे.
नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून एड. हुस्नबानू खलिफे या निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यापुर्वी त्यांनी शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पद भूषविलेले आहे. त्यावेळी त्या अखंड शिवसेनेच्या नगराध्यक्ष होत्या. तर विधानपरिषदेत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या आमदार म्हणून सहा वर्षे काम केले आहे. नगरसेविका, नगराध्यक्ष ते आमदार असा त्यांचा चढता राजकिय प्रवास आहे. एक आक्रमक व धडाडीचे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. नगरसेविका, नगराध्यक्ष व आमदार म्हणून काम करताना त्यांनी शहराच्या विकासाला प्राधान्य देत धडाकेबाज कामगिरी केली आहे. आता पुन्हा एकदा त्या नगराध्यक्षदाच्या निवडणूकीत रिंगणात उतरल्या आहेत. महाविकास आघाडीचे नेतृत्व करताना त्या स्वतासाठीही राजापूर वासीयांकडे मत मागत आहेत. त्यामुळे या निवडणूकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकास आघाडीत उबाठा गटाचे माजी आमदार गणपत कदमही प्रचाराची धुरा सांभाळत आहेत त्यामुळे उमेवार व माजी आमदार एड. खलिफे व कदम अशा दोन माजी आमदारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. यापुर्वी अनेक निवडणूकांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढलेले काँगेस आणि शिवसेना आत्ताचा उबाठा गट हे एकत्रित लढत आहेत. एड. हुस्नबानू खलिफे यांनी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शहर विकासाला दिलेला आकार हा मुद्दा घेऊन महाविकास आघाडी भविष्यातील विकासासाठी राजापूरकरांचा कौल मागत आहे. त्यांनी केलेली कामे व भविष्यातील त्यांच्या शहर विकासाच्या संकल्पना घेऊन त्या पुन्हा एकदा शहरवासीयांपुढे जात आहेत.
अपक्ष म्हणून हिंदू महासभेच्या ज्योती खटावकर या निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्या किती व कशा पध्दतीने मतदारांवर प्रभाव टाकतात हे मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. राजापुरकर अपक्ष उमेदवारांना फारसा प्रतिसाद देत नाहीत असा राजापुरचा इतिहास आहे. त्यामुळे राजापुरात नगराध्यक्षपदासाठी खरी लढत ही महायुतीच्या श्रृती ताम्हनकर व महाविकास आघाडीच्या एड. हुस्नबानू खलिफे यांच्यातच होणार आहे. आता राजापूरकर कोणाला आपला कौल देतात हे पहाण्यासाठी ३ डिसेंबरची वाट पहावी लागणार आहे. सध्या मात्र महायुती व महाविकास आघाडीने प्रचारासाठी कंबर कसली असून मतदारांच्या गाठीभेटी घेत आपला प्रचार केला जात आहे. पुढील काही दिवसात कडाक्याच्या थंडीत राजापुरातील राजकिय वातावरण तापणार आहे एवढं मात्र नक्की.
फोटो- एड. हुस्नबानू खलिफे, श्रृती ताम्हनकर, ज्योती खटावकर












