22 जण गंभीर
खेड : – मुंबई–गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावानजीक आज पहाटे मोठा अपघात झाला. पुण्याहून खेडच्या दिशेने येणारी खासगी आराम ट्रॅव्हलर बस बॅरिकेट तोडत थेट 45 ते 50 फूट खोल ओढ्यात कोसळली. हा अपघात पहाटे पाचच्या सुमारास झाला असून बसमधील 22 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी दहा प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ चिपळूण येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
कशेडी बोगद्याच्या अलीकडे महामार्गावरील पुलाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने एकच लेन वाहतुकीसाठी खुली ठेवण्यात आली होती. अर्ध्या रस्त्यावर बॅरिकेट्स लावण्यात आली होती. पहाटेच्या वेळी परिसरात दाट धुके असल्याने बसचालकाला बॅरिकेट दिसले नसल्याने बस थेट खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिक, महामार्ग पथक आणि पोलिसांनी वेळीच मदतकार्य सुरू केले. जखमींना खेड आणि चिपळूण येथील विविध खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी प्रवाशांमध्ये श्यामल विजय अंजर्लेकर (40, गिंभवणे दापोली), काजल मारुती शिगवण (23, दमामे दापोली), दिलीप शिवराम मोहिते (55, तळसर चिपळूण), अमरनाथ मिलिंद कांबळे (27, लातूर), दीपाली दत्ताराम नाचरे (27, भडवणे दापोली), प्रतीक प्रकाश गुरव (22, शिरवली खेड), प्रिया प्रकाश गुरव (23, शिरवली खेड), आलंदी बालाजी नाचरे (74, दमामे दापोली), सर्वेश दीपक गुहागरकर (22, आडे दापोली) आणि मयुरी मारुती शिगवण (45, दमामे दापोली) यांचा समावेश आहे. दरम्यान, स्थानिक पातळीवर आणखी एक महत्त्वाची माहिती चर्चिली जात आहे. खेड शहरातील एलपी इंग्लिश स्कूलसमोरून दररोज एसटी बसप्रमाणेच दिवसातून तीन वेळा ‘खेड–पुणे’ ही खासगी प्रवासी वाहतूक याच प्रकारच्या टेम्पो ट्रॅव्हलरद्वारे केली जाते. आज अपघातग्रस्त झालेली ट्रॅव्हलर देखील याच ठिकाणची असल्याचे सांगितले जात असून यामुळे प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नियमितपणे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला asun रस्त्यावर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी योग्य चिन्हांकन, प्रकाशयोजना आणि वाहतूक व्यवस्थापनात झालेल्या त्रुटींमुळेच हा अपघात घडल्याची शक्यता नाकारता येत नाही.












