लांजा नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी २६ अपक्ष उमेदवार रिंगणात

काही प्रभागात अपक्ष देणार शिवसेना महायुती, महाविकास आघाडीला तगडी लढत

लांजा -: लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यावेळी मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी एकूण २६ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यातील काही उमेदवारांनी आपल्याला पक्षाने तिकीट नाकारल्याने अपक्ष दावेदारी दाखल केली आहे.‌ त्यामुळे नगरपंचायतीच्या काही प्रभागांमध्ये हे अपक्ष उमेदवार महायुती तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कडवी लढत देणार आहेत. किंबहुना काही ठिकाणी या अपक्ष उमेदवारांचे पारडे प्रस्थापित राजकीय पक्षांपेक्षा जड असल्याचे चित्र आहे.‌ त्यामुळे साहजिकच या अपक्षांचा फटका महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लांजा नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर माजी नगरसेवकांबरोबरच हौशे, गौशे इच्छुक उमेदवारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात होती.‌ मात्र शिवसेना भाजपा महायुतीकडून आमदार किरण सामंत तसेच महाविकास आघाडी कडून देखील निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य देत देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे नाराज झालेल्या काही माजी नगरसेवकांनी अपक्षपणे निवडणूक रिंगणात उतरत थेट पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिले आहे. अपक्ष उमेदवारी दाखल केल्या अनेक उमेदवारांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवक, पदाधिकारी यांची संख्या जास्त आहे. या ठिकाणी भाजपाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत अपक्षपणे दावेदारी केली आहे.‌ यामध्ये नगराध्यक्ष पदा बरोबरच नगरसेवक पदासाठी देखील अपक्ष निवडणूक रिंगणात उतरल्याने त्याचाही फटका महायुतीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकूणच मोठ्या प्रमाणात निवडणूक रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार ही महायुती तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.तर काही प्रभागांमध्ये हे अपक्ष उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कडवी लढत देणार आहेत.‌ तर काही ठिकाणी त्याचे देखील पारडे जड आहे.
प्रभाग क्रमांक एक मध्ये एका जागेसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना उबाठा कडून आशिया फिरोज नेवरेकर तर शिवसेनेकडून निधी निलेश गुरव. अपक्ष म्हणून अमृता सुशील कुलकर्णी प्रियांका समीर दळवी आणि चेतना भालचंद्र कांबळे निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक दोन मध्ये तीन उमेदवार रिंगणात आहेत.शिवसेना उबाठा कडून राहुल तोडकरी, शिवसेना कडून पंढरीनाथ बाळकृष्ण मायशेट्ये आणि अपक्ष ओंकार विश्वास आंब्रे निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवसेना उबाठा कडून जानवी सुनील तुळसणकर, शिवसेनेकडून श्रद्धा संजय तोडकरी तर अपक्ष म्हणून श्वेता प्रकाश तरळ निवडणूकीला सामोरे जात आहेत.
प्रभाग क्रमांक चार मध्ये एका जागेसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये अंजली अनिल कांबळे या अपक्ष असून शिवसेनेकडून सानिका समीर जाधव तर शिवसेना उबाठा कडून सुशीला गणपत कांबळे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून कमल कमलाकांत लांजेकर या रिंगणात आहेत.
प्रभाग क्रमांक पाचमध्ये एका जागेसाठी सिद्धेश जयराम भोवड आणि दिलीप चौगुले हे दोन्ही अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या ठिकाणी भोवड हे मोठ्या संख्येने विजयी होतील. प्रभाग क्रमांक सहा मध्ये एका जागेसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेना उबाठा कडून दीपक राजेश आडविलकर तर शिवसेनेकडून योगेश गोपीनाथ कावतकर हे रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे संकेत शरद वेद्रे, राजेंद्र प्रभूदेसाई आणि दिलीप चौगुले हे तीन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक सात मध्ये एका जागेसाठी चार उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. त्यामध्ये अनुष्का रमेश गोसावी या शिवसेना उबाठा कडून तर प्रांजल प्रथमेश यादव या शिवसेनेकडून लढत आहेत. या खेरीज शितल चंद्रशेखर सावंत या माजी नगरसेविका आणि शिवानी गोडबोले हे दोन्ही उमेदवार अपक्षपणे लढत आहेत. प्रभाग क्रमांक आठ मध्ये तगडी लढत पहावयास मिळणार आहे. या ठिकाणी शिवसेनेकडून महेश मधुकर बामणे हे रिंगणात असून त्यांच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून वैभव यशवंत लांजेकर हे रिंगणात आहेत.‌ तर माजी नगरसेविका मधुरा लांजेकर यांचे पती मिलिंद मनोहर लांजेकर तसेच निखिल प्रकाश लांजेकर आणि अकबर नाईक हे तीन उमेदवार अपक्षपणे लढा देत आहेत. प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना तसेच अपक्ष यांच्यात तगडी लढत होणार आहे. यामध्ये शिवसेनेकडून माजी नगरसेवक दिलीप मुजावर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून राजेश काशिनाथ लांजेकर तर अपक्ष म्हणून माजी नगरसेवक रफिक नेवरेकर निवडणूक रिंगणात आहेत.
प्रभाग क्रमांक दहा मध्ये शिवसेना उबाठा विरुद्ध भाजपा यांच्यात लढत होणार आहे. या ठिकाणी शिवसेना उबाठा कडून स्वरा मनोज राऊत तर भारतीय जनता पार्टी कडून प्रणाली गुरुप्रसाद तेली या रिंगणात आहेत. उमेदवारी न मिळाल्याने या ठिकाणी माजी नगरसेविका मधुरा मिलिंद लांजेकर या अपक्षपणे रिंगणात उतरलेल्या आहेत. प्रभाग क्रमांक ११ या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस कडून रेणुका राजेश राणे तर शिवसेनेकडून नीलिमा अशोक कनावजे यांच्यात कडवी लढत होणार आहे. या ठिकाणी प्रवीणा प्रकाश गुरव या अपक्ष आहेत.
प्रभाग क्रमांक १२ मध्ये कडवी लढत पहावयास मिळणार आहे. या ठिकाणी शिवसेना उबाठा कडून अवनी चंद्रशेखर धावणे तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून शमा थोडगे या रिंगणात उतरले आहेत.‌ या मतदारसंघात माजी नगरसेविका असलेल्या वंदना रामचंद्र काडगाळकर या अपक्षपणे रिंगणात उतरलेल्या आहेत .‌ प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवसेनेकडून साक्षी किशोर मानकर तर राष्ट्रीय काँग्रेस कडून चैताली विराज मुळे तर अपक्ष म्हणून अवंतिका चंद्रशेखर सावंत या रिंगणात उतरले आहेत. प्रभाग क्रमांक १४ मध्ये शिवसेना विरुद्ध उबाठा शिवसेना यांच्यात लढत होणार आहे. या ठिकाणी शिवसेनेकडून वैभव यशवंत जोईल तर उबाठा शिवसेने कडून अक्षय नामदेव कुरूप तर अपक्ष म्हणून किशोर तुकाराम यादव हे रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक १५ मध्ये प्रकाश शांताराम गुरव हे शिवसेना उबाठा कडून तर शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष राहिलेले मनोहर धनाजी बाईत हे रिंगणात उतरले आहेत. या ठिकाणी योगेश यशवंत खावडकर हे अपक्षपणे टक्कर देणार आहेत.
प्रभाग क्रमांक १६ मध्ये अपक्ष विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. शिवसेनेकडून दीपक सखाराम निवळे तर अपक्ष म्हणून अनिल धोंडू गुरव यांच्या सामना लागणार आहे.‌ प्रभाग क्रमांक १७ मध्ये देखील शिवसेना विरुद्ध अपक्ष अशी लढत होणार आहे.‌ शिवसेनेकडून शिवण्या शैलेश काळे तर अपक्ष म्हणून नेहा मदन राडये यांच्यामध्ये लढत होणार आहे.