राजापूर शहर वासीय पुन्हा संधी देणार काय याबाबत उत्सुकता
राजापूर:
राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांसाठी सर्वच प्रभागांतील नगरसेवक पदाची निवडणूकही अतिशय चुरशीची होणार आहे. काही प्रभागात दुरंगी तर काही प्रभागात तिरंगी लढत होत असून नगरसेवक पदाच्या या लढतीमंध्ये माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष एड. जमिर खलिफे यांसह तब्ब्बल आठ माजी नगरसेवक पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात उतरत आपले भवितव्य आजमावत आहेत. त्यामुळे राजापूर शहर वासीय या आठही नगरसेवकांना पुन्हा सभागृहात पाठवतात काय? याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
विविध राजकिय पक्षांतुन व वेगवेगळया प्रभागातुन निवडणूक लढविणाऱ्या या माजी नगरसेवकांमध्ये एड. जमिर खलिफे, संजय ओगले, सौरभ खडपे, विनय गुरव, सुभाष बाकाळकर, सुलतान ठाकूर, नेहा तानवडे व यापुर्वी सभागृहात स्विकृत नगरसेवक म्हणून काम केलेले अनिल कुडाळी यांचा समावेश आहे.
एड. खलिफे हे चौथ्यांदा तर संजय ओगले, सुलतान ठाकूर तिसऱ्यांदा मतदारांचा कौल मागत आहेत. तर खडपे, बाकाळकर, गुरव, तानवडे या दुसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
राजापूर नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष एड. जमिर खलिफे हे चौथ्यांदा नगरसेवक पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यापुर्वी त्यांनी सन २००८, २०११ व २०१६ मध्ये नगरसेवक म्हणुन काम केलेले आहे. तर सन २०१८ ते २०२१ या कालावधीत त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. आपल्या नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी करत जनमानसात आपला ठसा उमटवलेला आहे. संपुर्ण शहरात त्यांचा चाहता वर्ग आहे. आता ते आपल्या पारंपारिक प्रभाग क्रमांक सहा ब मधून पुन्हा निवडणूकीला सामोरे जात आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीकडून शिवसेनेचे खलिल सय्यद निवडणूक लढवत आहेत. या दुरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
माजी नगरसेवक संजय ओगले आपल्या पारंपारीक प्रभागातुन निवडणूक लढवत आहेत. यापुर्वी दोन वेळा नगरसेवक राहिलेले ओगले हे तिसऱ्यांदा नगरसेवक पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात आहेत. नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाक क्रमांक नऊ ब मधून ते शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उबाठाचे सुबोध पवार व अपक्ष म्हणून संजय गणपत ओगले निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीचे
माजी नगरसेवक सुलतान ठाकूर हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. आपल्या पारंपारिक प्रभाग सात ब मधून ते आपले भवितव्य आजमावत आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीचे शिवसेनेचे असिम साजिद काझी हे प्रथमच निवडणूक लढवत आहेत. या दुरंगी सामन्यात या प्रभागातुन ठाकूर हॅट्रीक करणार का याबाबत उत्सुकता आहे.
तर माजी नगरसेवक व शिवसेनेचे गटनेते म्हणून काम केलेले विनय गुरव हे महाविकास आघाडीकडून उबाठा पक्षाचे उमेदवार म्हणून आपल्या पारंपारिक प्रभाग क्रमांक तीन ब मधून दुसऱ्यांदा आपले भवितव्य आजमावत आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीचे शिवसेनेचे तरूण उमेवार दिपक गुरव व अपक्ष उमेदवार विवेक गुरव निवडणूक लढवत आहेत.
शिवसेनेचे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक सौरभ खडपे हे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आपल्या प्रभाग क्रमांक एक ब मधून निवडणूकीला सामोरे जात आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे अरबाज इब्राहिम खलिफे हे प्रथमच आपले भवितव्य आजमावत आहेत. त्यामुळे या दुरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडेही साऱ्यांचे लक्ष आहे.
माजी नगरसेवक सुभाष बाकाळकर हे पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक चार ब मधून ते रिंगणात असुन त्यांचा सामना महायुतीचे दीलीप अमरे व अपक्ष राकेश खटावकर यांच्याशी होणार आहे.
माजी नगरसेविका नेहा तानवडे या पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. प्रभाग तीन अ मधून त्या महाविकास आघाडीकडून उबाठाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीच्या आरती गणेश जाधव व अपक्ष विद्या विवेक जाधव या निवडणूकीच्या रिंगणात आहेत. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे शहर वासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
यापुर्वी स्विकृत नगरसेवक म्हणून काम केलेले शिवसेना उबाठाचे अनिक कुडाळी हे आता जनतेत आपला कौल आजमावत आहेत. प्रभाग क्रमांक दोन अ मधून ते निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी महायुतीचे दिलीप चव्हाण व अपक्ष जितेंद्र करंगुटकर यांच्याशी त्यांची लढत आहे. त्यामुळे या लढतीकडेही साऱ्यांचे लक्ष आहे.
या आठ माजी नगरसेवकांपैकी किती जणांना राजापूरवासीय संधी देतात व कोण कोण पुन्हा सभागृहात जातो हे ३ डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.
फोटो एड. जमिर खलिफे, संजय ओगले, सुलतान ठाकूर, विनय गुरव, सौरभ खडपे, नेहा तानवडे, सुभाष बाकाळकर, अनिल कुडाळी.











