खेड (प्रतिनिधी) — घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २६ नोव्हेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीत विविध शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांच्या प्रारंभाप्रसंगी महाविद्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
उद्देशिका वाचनाचा कार्यक्रम केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि नागरिकत्वाच्या नैतिक जबाबदाऱ्या यांची सखोल माहिती व्हावी, यासाठी महाविद्यालयाने विशेष प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी भारतीय संविधानाच्या प्रती ग्रंथालयात उपलब्ध करून देण्यात आल्या असून या माध्यमातून संविधानाबद्दलची जाण अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पुढील टप्प्यात १५ जानेवारी ते २० जानेवारी २०२६ दरम्यान ग्रंथालय विभागामार्फत भारतीय संविधानावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत यासाठी ग्रंथालय विभागाने आवाहन केले असून, संविधानाचा अभ्यास करून अधिकाधिक विद्यार्थी आपली तयारी पूर्ण करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, रजिस्ट्रार मा. संदीप मुनघाटे तसेच प्रा. व्ही. एम. माळी यांचे विशेष सहकार्य लाभले. संविधान दिनाच्या कार्यक्रमाने महाविद्यालयात राष्ट्रप्रेम, लोकशाही मूल्यांची जाणीव आणि संवैधानिक कर्तव्यांची प्रेरणा विद्यार्थ्यांत रुजविण्याचा प्रयत्न अधिक बळकट केला.












