महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेत गोंधळ; निकाल विलंबावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची तीक्ष्ण प्रतिक्रिया

खेड 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत निर्माण झालेल्या गोंधळावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी मतदान पूर्ण झाल्यानंतर निवडणुका रद्द करण्यात आल्या असून, या निर्णयाचा परिणाम उद्या जाहीर होणाऱ्या निकालांवर होऊ शकतो, असे निरीक्षण खंडपीठाने व्यक्त केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरणात आणखी गोंधळ वाढला आहे.
योगेश कदम म्हणाले, “महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा प्रकार पाहायला मिळतोय. वीस वर्षे राजकारणात आहे, अनेक निवडणुका पाहिल्या, पण मतदान झाल्यानंतर २०–२१ दिवसांनी निकाल लावण्याची वेळ कधीच आली नव्हती. आचारसंहितेची पुढील २१ दिवसांची स्थिती काय असेल, कोणती बंधने लागू होतील, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. यावेळी नियोजनामध्ये स्पष्ट चुका झाल्या हे यातून दिसून येते.”
त्यांनी निवडणूक आयोगावर थेट टीका करत सांगितले की, “आयोगामध्येच गोंधळ असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इतके बदल झाले. ठोस नियोजन नसल्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.” आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महानगरपालिका निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे सांगत कदम यांनी अपेक्षा व्यक्त केली की, “किमान पुढील निवडणुकांमध्ये तरी व्यवस्थित, सुयोग्य आणि पारदर्शक नियोजन व्हावे. मतदारांना आणि उमेदवारांना संभ्रमात न ठेवता निकाल वेळेवर जाहीर करण्याची जबाबदारी आयोगाने पाळली पाहिजे.”
सद्यस्थितीत गोंधळ वाढत असला तरी, योग्य नियोजन आणि स्पष्टता आली तर आगामी निवडणुका सुरळीत पार पडतील, असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला.