लांजा (प्रतिनिधी): कावडी येथे पार पडलेल्या ५३ व्या बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागातून ज. गं. पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथील चिराग पाटोळे (७वी) व निनाद माने (७वी) यांनी सादर केलेल्या ‘ग्लुकोज लेव्हल डिटेक्टर’ या प्रतिकृतीने लांजा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
पंचायत समिती शिक्षण विभाग, लांजा आणि श्री सरस्वती विद्या निकेतन माध्यमिक शाळा, खावडी यांच्या संयुक्त विद्यमाने या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तळवडे विद्यालयाने सुयश संपादन केले. प्राथमिक विभागातून ‘ग्लुकोज लेव्हल डिटेक्टर’ या प्रतिकृतीने लांजा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य स्पर्धेत प्राथमिक विभागामध्ये प्रशालेतील शिक्षिका श्वेता सावंत यांनी तृतीय क्रमांक मिळविला. प्रदर्शनात माध्यमिक विभाग प्रतिकृती स्पर्धेत श्रीराम लांजेकर व विक्रम चव्हाण तर विज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धेत समिक्षा बेंद्रे, जान्हवी दरडे यांनी सहभाग घेतला होता. तसेच प्रशालेच्या विद्यार्थिनी गायत्री दरडे व जान्हवी घाणेकर यांनी प्रतिकृती तयार करण्यासाठी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना विज्ञान विभाग प्रमुख स्वरा वासुरकर यांनी मार्गदर्शन केले.
प्रशालेच्या यशाबद्दल तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई अध्यक्ष आनंद पेडणेकर, कार्यवाह मनोहर पाटोळे, स्थानिक संस्थेचे अध्यक्ष दिगंबर पाटोळे, उपाध्यक्ष संजय पाटोळे, कार्यवाह मनोहर पाटोळे, शाळा समितीचे चेअरमन कॅ. नामदेव पाटोळे, सदस्य विजय पाटोळे, मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आदींनी सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक यांचे अभिनंदन केले.













