मसुरे | झुंजार पेडणेकर :प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक २१ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत हवामान मुख्यत्वे निरभ्र आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमानात (३३ ते ३४ अंश सेल्सिअस) आणि किमान तापमानात (१९ ते २१ अंश सेल्सिअस) काही अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय कृषी अधिकारी, कणकवली यांनी आंबा, काजू आणि नारळ बागायतदारांसाठी पुढील प्रमाणे कृषी सल्ला जारी केला आहे.
आंबा पीक (बोंगे फुटण्याची ते फुलोरा अवस्था)
फळधारणा सुधारण्यासाठी: विद्यापीठाच्या शिफारशीनुसार झाडांची फळगळ कमी करण्यासाठी व चांगली फळधारणा होण्यासाठी ‘आम्रशक्ती’ या विद्राव्य अन्नद्रव्याची १ लिटर प्रति १९ लिटर पाणी (एकूण २० लिटर द्रावण) या प्रमाणात चार मोहोर आलेल्या झाडांवर फवारणी करावी.
तुडतुडे नियंत्रण: कोरड्या हवामानामुळे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
बोंगे फुटताना: लॅम्बडासायहॅलोथ्रीन ५% प्रवाही – ६ मि.ली. प्रति १० लिटर पाणी.
मोहोर फुलण्यापूर्वी: इमिडाक्लोप्रिड १७.८% प्रवाही – ३ मि.ली. किंवा ब्युप्रोफेझीन २५% प्रवाही – २० मि.ली. प्रति १० लिटर पाणी.
मोहोर फुलल्यानंतर (कणी अवस्था): थायोमेथोक्झाम २५% दाणेदार – १ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
महत्त्वाची टीप: मोहोर नुकताच फुलत असताना परागीकरण करणाऱ्या कीटकांना इजा टाळण्यासाठी फवारणी शक्यतो टाळावी. आवश्यक असल्यास सकाळी ९:०० ते १२:०० ही वेळ टाळून सकाळी लवकर किंवा संध्याकाळी फवारणी करावी.
२. काजू पीक (फुलोरा ते फळधारणा अवस्था)
कीड नियंत्रण: ढेकण्या व फुलकिडीच्या प्रादुर्भावापासून संरक्षणासाठी, फळे वाटाणा आकाराची होत असताना ॲसिटामिप्रीड ०.५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
उत्पन्न वाढीसाठी: मोहोर आल्यावर १९:१९:१९ या विद्राव्य खताची २० ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी.
नैसर्गिक अर्क: फळधारणा वाढवण्यासाठी सुकलेल्या माशांचा अर्क (५०० ग्रॅम प्रति १० लिटर) पहिली फवारणी फुलोऱ्याच्या वेळी व दुसरी १० दिवसांनी करावी.
गोमूत्र वापर: काजू बीचा आकार वाढवण्यासाठी १:३ प्रमाणात गोमूत्र व पाणी (उदा. १२५० मि.ली. गोमूत्र + ३७५० मि.ली. पाणी) यांचे ५ लिटर द्रावण प्रति झाड फवारावे. बागायतदारांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.











