झाडावरून पडून ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; रत्नागिरी तालुक्यातील डुगवे येथील तरुणावर काळाचा घाला

रत्नागिरी ः प्रतिनिधी
झाडे तोडण्याच्या मजूरीवर काम करणारा तरुण झाडावरुन पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू उपचारांदम्यान त्याचा मृत्यू झाला.
अजित संतोष भोवड (31, रा. डुगवे-कुरतडे, ता. रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवार 18 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वा. सुमारास चाफे येथे घडली. अजित हा झाडे तोडण्यासाठी तालुक्यातील चाफे येथे गेला होता. दुपारच्या सुमारास झाड तोडत असताना आानकपणे तोल जाउन तो खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने प्रथम मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना गुरुवारी 8.45 वा.सुमारास त्याचा मृत्यू झाला. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.