चार लाखाच्या गोवा बनावटी दारू सह दहा लाखाचा मुद्देमाल जप्त
कुडाळ : प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत पावशी कुंभारवाडी येथे अवैध दारू वाहतुकीविरोधात कारवाई केली. या कारवाईमध्ये चार लाख तीस हजार आठशे रुपये किमतीच्या गोवा बनावटी दारू सह दोघांना कार सह ताब्यात घेतले आहे.
अक्षय चंद्रशेखर घाडीगांवकर (वय २४ वर्षे), रा. रामगड, मालवण आणि प्रकाश सुरेश सावंत, रा. कणकवली हे दोघे मध्यरात्री गोवा ते मुंबई महामार्गावर महिंद्रा झायलो कारने प्रवास करीत होते. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथकाला पावशी कुंभारवाडी येथे तपासणी वेळी कारमध्ये ४ लाख ३० हजार ८०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आढळून आली.
त्यामुळे पथकाने गोवा बनावटी दारू आणि ६ लाख रुपये किमतीची महिंद्रा झायलो कार सह दोघांना ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत रु. १० लाख ३० हजार ८०० रुपये इतकी आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भोसले, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर व पोलीस कॉन्स्टेबल समजिस्कर यांच्या पथकाने केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून कुडाळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (इ), ८१, ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












