दोडामार्ग सुहास देसाई
दोडामार्ग तालुक्यातील पाळये परिसरात पाच हत्तींच्या कळपाने पुन्हा एकदा जोरदार शिरकाव करत शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. या कळपाने सेवानिवृत्त पोस्ट अधिकारी गणपत दळवी यांच्या केळी, नारळ आणि सुपारीच्या बागेवर हल्ला चढवून ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली. या घटनेमुळे दळवी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मेहनतीने फुलवलेली बाग एका रात्रीत भुईसपाट!!
पाळये येथील गणपत दळवी हे मुंबईत पोस्ट खात्यात वरिष्ठ पदावर कार्यरत होते. निवृत्तीनंतर शहरात न राहता आपल्या मूळ गावी राहून काहीतरी वेगळे करण्याच्या जिद्दीने त्यांनी पाळये येथे केळी, नारळ, सुपारी आणि बांबूची मोठी लागवड केली होती. त्यांची ही आदर्श शेती पाहून परिसरातील इतर शेतकरीही प्रेरित होत होते. मात्र, बुधवारी रात्री अचानक आलेल्या पाच हत्तींच्या कळपाने या मेहनतीवर पाणी फेरले. हत्तींनी केवळ पीक खाल्लेच नाही, तर नारळाची झाडे मुळासकट उपटून टाकली आणि केळीची बाग तुडवून काढली.

शेतकरी हवालदिल; वनविभागाकडे मदतीची मागणी
सकाळी बागेची पाहणी केल्यावर सर्वत्र विध्वंस पाहायला मिळाला. वारंवार होणाऱ्या हत्तींच्या त्रासामुळे शेती कशी करायची, असा गंभीर प्रश्न आता पाळयेतील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. दिवसा नुकसानीची चिंता आणि रात्री हत्तींच्या हल्ल्याची भीती अशा दुहेरी संकटात सध्या इथला बळीराजा सापडला आहे.
वनविभागाने तातडीने या हत्तींच्या कळपाचा बंदोबस्त करून त्यांना घनदाट जंगलात हुसकावून लावावे. गणपत दळवी यांच्यासह इतर बाधित शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करून योग्य भरपाई द्यावी. हत्तींना रोखण्यासाठी परिसरात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. अशा मागण्या शेतकरी वर्गातून केल्या जात आहे













