डार्क वेब व परदेशातून ड्रग्स व्यवहार, 4.5 कोटींची उलाढाल
पुणे पोलिसांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर तपास
पुणे शहरात उघडकीस आलेल्या हायड्रोपोनिक गांजा प्रकरणात पोलिस तपासात मोठी आर्थिक साखळी समोर आली आहे. ड्रग्सच्या बेकायदेशीर उत्पादन आणि विक्रीतून तब्बल 25 क्रिप्टो वॉलेट्सद्वारे सुमारे 4.5 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे व्यवहार डार्क वेब आणि परदेशातील काही देशांमधून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणाचा आर्थिक मागोवा घेण्यासाठी आता केंद्रीय यंत्रणांची मदत घेण्यात आली आहे. संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पुणे पोलिसांचा तपास अधिक तीव्र झाला आहे.
पुणे : हायड्रोपोनिक गांजा तयार करून त्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीच्या तपासात पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या व्यवहारातून एकूण 25 क्रिप्टो वॉलेट्स सापडले असून त्यातून सुमारे 5 लाख डॉलर (अंदाजे 4.5 कोटी रुपये) कमावले गेल्याचे उघड झाले आहे. ही सर्व क्रिप्टो वॉलेट्स डार्क वेब आणि स्कॅन्डिनेव्हियन देशांमधून कार्यरत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी सांगितले की, या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास करण्यासाठी फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट ऑफ इंडियाची मदत घेण्यात आली आहे. डिजिटल करन्सीमध्ये पैसे कसे रूपांतरित करण्यात आले आणि त्यासाठी कोणत्या बँक खात्यांचा वापर झाला, याचा तपास सुरू आहे. या चौकशीतून संपूर्ण गुन्हेगारी जाळ्याची आर्थिक बाजू स्पष्ट होणार असून, क्रिप्टो वॉलेट्स गोठवण्याची प्रक्रियाही हाती घेतली जाणार आहे.
या तपासात पोलिसांनी भूतान आणि थायलंड येथील कायदा अंमलबजावणी संस्थांशी संपर्क साधला आहे. अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल या दोन देशांतून पुरवला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात भूतान आणि थायलंडमधील दोन संशयितांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.
प्रहार डिजिटलने यापूर्वी दिलेल्या वृत्तानुसार, 18 डिसेंबर रोजी एका अभियांत्रिकी विद्यार्थ्यासह दोन एमबीए पदवीधर आणि मुंबईतील दोन व्यक्तींना अटक करण्यात आली होती. या कारवाईत 3.5 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. हिंजवडी येथील एका फ्लॅटमध्ये हायड्रोपोनिक गांजा तयार करणारे अवैध ड्रग प्रोसेसिंग युनिट चालवले जात असल्याचा पर्दाफाश झाला होता.
तपासात समोर आले की, दोन एमबीए पदवीधरांनी नोकऱ्या सोडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत अवैध ड्रग उत्पादन सुरू केले होते. या टोळीने क्रिप्टोकरन्सी, डार्क वेब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ड्रग्सची खरेदी-विक्री केली. या प्रकरणात मुंबईतील कुर्ला आणि घाटकोपर भागातून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, भूतानमधील व्यक्ती LED स्ट्रिप्सच्या स्वरूपात ड्रग्स पुण्याला पाठवत होते. या स्ट्रिप्सच्या बल्बमध्ये अमली पदार्थ लपवलेले होते. थायलंडमधून ड्रग्स भूतानमध्ये पाठवले जात असल्याचेही तपासात उघड झाले असून, या संपूर्ण आंतरराष्ट्रीय साखळीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.












