एकांकिका स्पर्धेत जिकण्यासाठीच संघांनी उतरावे….!

तुषार भद्रे यांचा सल्ला….!

कणकवलीत नाथ पै एकांकिका स्पर्धा उत्साहात…!

 

कणकवली – एकांकिका स्पर्धांमध्ये उतरताना संघांनी आपल्याला एक नंबर मिळवायचा हे ध्येय ठेवून स्पर्धेत उतरले पाहिजे. स्पर्धकांनी नाट्याचा विषय हा प्रेक्षकांना सहजपणे पोहोचवला पाहिजे. नाथ पै एकांकिका स्पर्धेत शालेय गटात सहभागी झालेल्या संघांमधील कलाकरांचे परफॉर्मन्स अविस्मरणी ठरले. मात्र, खुल्या गटातील संघांच्या कलाकारांचे परफॉर्मन्स गोंधळलेल्या अवस्थेत पाहायला मिळाले. यापुढील काळात कलाकारांनी एकांकिका सादर करताना गोंधळलेल्या अवस्थेत परफार्मन्स न करण्याचा सल्ला ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, स्पधेर्चे परीक्षक तुषार भद्रे यांनी दिला.

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या ४८ व्या नाथ पै एकांकिका स्पर्धेच्या समारोप बक्षीस वितरण सोहळ्यात श्री. भद्रे बोलत होते. यावेळी स्पधेर्चे परीक्षक एसएनडीसीच्या मराठी विभागप्रमुख, कवयित्री, अभिनेत्री, अनुवादक डॉ. प्रिया जामकर, विविध चार भाषांमध्ये रंगभूमीवर काम करणारे अभिनेते प्रदीप वेंगुर्लेकर उपस्थित होते.

भद्रे म्हणाले, नाथ पै एकांकिका स्पर्धेतील खुल्या गटातील संघांमधील काही कालाकार हे केवळ नरडयातून बोलत होते. त्यांच्या अभिनयात बॉडी लॅगवेज दिसून येत नव्हती. एकांकिकांमध्ये भूमिका कशाप्रकारे सादर कराव्यात याबाबत मार्गदर्शन करण्याची केव्हा संधी मिळाली, तर मी नक्कीच याठिकाणी येईन. एकांकिका सादरी करणात संघ कोणत्या स्तरावर सादरी करण करतो, याचा अंदाज १० मिनिटांत परीक्षक व प्रेक्षकांना येतो. त्यामुळे त्या एकांकिकेचे शेटर डाऊन होते. त्यामुळे एकांकिकांमधील भूमिका सादर करताना कलाकारांनी आपले सर्वस्व पणाला लावून भूमिका करून रंगमंच जीवंत केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रदीप वेंगुर्लेकर म्हणाले, नाथ पै एकांकिकांमध्ये मी अनेक वेळा परफार्मन्स केला आहे. नाथ पै एकांकिका स्पर्धेचे रंगमंच जिंकण्याची उर्मी मिळवून देतो. नाट्य क्षेत्रात वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे मोलाचे योगदान आहे. या प्रतिष्ठानमध्ये काम करणारी मंडळी नाट्य चळवळ पुढे नेण्यासाठी स्वत:चा किमती वेळ खर्च करून आहोरात्र मेहनत घेत आहे. शालेय गटात स्पर्धा घेणारी राज्यातील बहुधा वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची नाथ पै एकांकिका स्पर्धा एकमेव स्पर्धा आहे, असे सांगतानाच नाट्यकर्मी रघुनाथ कदम यांच्या जाण्याने नाट्यक्षेत्राची मोठी हानी झाली असून त्यांचे कार्य आपण सर्वांनी पुढे नेऊया, असे आवाहन त्यांनी केले. आरंभी परीक्षकांचा वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार शरद सावंत यांनी मानले. यावेळच्या एकांकिकेचे महत्त्व म्हणजे नाट्य रसिक प्रेक्षकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली.