भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा संपन्न
देवरूख (प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहराच्या नूतन नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये यांनी सोमवारी पदभार स्विकारला. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन यांच्या उपस्थितीत नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये हा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन यांच्याहस्ते नूतन नगराध्यक्षा मृणाल शेटये यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर मान्यवरांच्याहस्ते महायुतीच्या ११ नगरसेवकांचा देखील सत्कार करण्यात आला.
यात नगरसेविका समृद्धी वेलवणकर, स्वाती राजवाडे, श्रद्धा इंदुलकर, कविता नार्वेकर, प्राची भुवड, नेहा आंबेकर, रूपाली बेंद्रे, नगरसेवक यशवंत गोपाळ, दिपक गेल्ये, वैभव पवार, दिपक खेडेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना दिपक पटवर्धन म्हणाले कि, देवरूख शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या बाजूने मतदारराजाने कौल दिला असून देवरूख नगरपंचायतीवर महायुतीची सत्ता आली आहे. नूतन नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये यांनी पदभार स्विकारला आहे. त्या सर्वांना एकत्रित घेऊन काम करतील, जनतेने दाखवलेला विश्वास याला सदैव पात्र रहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजकारण करताना दिलेली स्त्री सुत्री याला बांधील राहून काम करा. जनता आपल्याला वारंवार निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर देवरूखच्या नूतन नगराध्यक्षा मृणाल शेटये यांनी सत्काराला उत्तर देताना गेली पाच वर्षे आपण देवरुखच्या विकासासाठी चांगले काम केले याचे फलित म्हणून जनतेने पुन्हा आपल्याला निवडून दिले आहे. या विश्वासाला कोणताही तडा न जाऊ देता देवरूख शहराच्या विकासासाठी चांगले काम करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी सभापती पूजा निकम यांनी देखील बोलताना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण असे काम करत रहावे यश निश्चित मिळते. महायुतीचा धर्म पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाळला यामुळेच नगरपंचायत निवडणुकीत मोठे यश महायुतीला मिळाले असे नमूद करून सर्वांनी असेच एकत्रितपणे काम करा अन देवरुखचा कायापालट करा, असे सांगितले.
या कार्यक्रमात भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव भाजपा युती सत्तेत पुन्हा बसली याचा आनंद आपल्याला होत आहे. गेली पाच वर्षे केलेल्या कामाची जनतेने पोचपावती दिली असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेसाठी आपण काम करत राहू असे नगराध्यक्षांच्या वतीने अधटराव यांनी वचन दिले. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते मुकुंद जोशी, सदानंद भागवत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, महिला संघटक संगीता जाधव, भाजपचे तालुकाध्यक्ष रुपेश कदम, विनोद मस्के, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेटये, उमेश कुलकर्णी, संदेश करमरकर, मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.













