खेड (प्रतिनिधी) — राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी केलेले निलंबन आपण मान्य करत नसल्याचे स्पष्ट करत ज्येष्ठ कार्यकर्ते जलाल भाई राजपुरकर यांनी तालुका राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता होतो, आहोत आणि कायम राहणार असून अशा प्रकारच्या कारवाईला घाबरणार नसल्याचेही त्यांनी ठाम शब्दांत सांगितले.
तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी पक्षाची 1990 ते 1995 या कालावधीतील स्थिती बिकट होती, असे केलेले वक्तव्य अभ्यासाशिवाय आणि बालिशपणाचे असल्याची टीका राजपुरकर यांनी केली. पक्षाची स्थापना कधी झाली, त्या काळातील राजकीय परिस्थिती काय होती, याची माहिती नसतानाच अशी विधाने केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या काळात आपण स्वतः पदाधिकारी होतो आणि खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जडणघडणीसाठी प्रतिकूल परिस्थितीतही खांद्याला खांदा लावून काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
जलाल भाई राजपुरकर यांचा पक्षप्रवेश संजय जाधव यांनी करून घेतला, हा दावा हास्यास्पद असल्याचे सांगत त्यांनी याला जोरदार विरोध केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी संजय जाधव यांना कोणत्याही परिस्थितीत तालुकाध्यक्षपद हवे होते आणि त्यासाठी त्यांनी हट्ट धरल्याचा आरोपही त्यांनी केला. इतर कोणतेही पद स्वीकारण्याची तयारी नसताना, गरज पडल्यास दुसऱ्या पक्षात जाण्याची मानसिकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या संदर्भात असगनी येथील एका कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांच्याशी आपण चर्चा केल्याचे राजपुरकर यांनी सांगितले. त्यावेळी निवडणुकीपूर्वी कोणत्याही नियुक्त्या न करण्याचे स्पष्ट निर्देश तटकरे यांनी दिले होते आणि त्यामुळे विद्यमान तालुकाध्यक्ष स. तू. कदम हेच पदावर राहतील, असेही ठरले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपण जिल्ह्याचे सरचिटणीस असताना जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्याकडून पत्र तयार करून घेतले होते, मात्र तटकरे साहेबांनी स्पष्ट सांगितल्याशिवाय कोणतीही सही करणार नसल्याचे जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याचे राजपुरकर यांनी नमूद केले. त्या काळात संजय जाधव यांनी पक्षाच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन विधाने केली होती, असा आरोप करत आपण मात्र कधीही पक्षविरोधी भूमिका घेतली नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
खेड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा न मिळाल्यानंतर तालुकाध्यक्षांनी ईव्हीएम घोटाळ्याचा संशय व्यक्त केला होता. यावर प्रतिक्रिया देताना राजपुरकर यांनी टोला लगावला की ईव्हीएम घोटाळा झाला की नाही, यावर कदाचित तालुकाध्यक्षांनी संशोधन केले असेल, मात्र निवडणुकीतील अपयशाचे खरे कारण शोधण्यासाठी आत्मपरीक्षण करणे अधिक गरजेचे आहे.
नगरपरिषद निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले गेले नाही, त्यामुळे अनेक जण अलिप्त राहिल्याचा आरोप करत राजपुरकर यांनी सांगितले की “मी मतदारांना सांभाळतो, कार्यकर्त्यांना सांभाळतो” ही केवळ बोलाची कडी आणि बोलाचा भात आहे. संघटनात्मक कामांमध्ये तालुकाध्यक्ष कमी पडत असून अनेक वेळा ते कार्यक्रमांना उपस्थित राहत नसल्याची बाब आपण जिल्हाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्याशी कोणताही वैयक्तिक आकस नसल्याचे सांगत राजपुरकर यांनी पक्षातील चुका मांडणे हे पक्षहिताचेच असून त्यापलीकडे आपण काहीही केले नसल्याचे सांगितले. त्यामुळे तालुकाध्यक्षांनी केलेले निलंबन आपण मान्य करत नसल्याचे स्पष्ट करत, पक्षाशी निष्ठा कायम ठेवत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार जलाल भाई राजपुरकर यांनी व्यक्त केला.













